यंदाचा दुष्काळ हा तीव्र स्वरुपाचा असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या
चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जनावरे जगविणे अवघड बनले असतानाच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शासनाने
सुरु केलेल्या चारा छावण्या या पशुधनासाठी आधार ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.
छावण्यांमुळे जनावरांच्या चारा, पाण्याची सोय झाल्याने
छावणी परिसरातील गावांमधील पशुपालकांमध्ये समाधान दिसून येत आहे. मात्र छावणी सुरु केल्यापासून प्रशासकीय
यंत्रणेकडील वेगवेगळ्या अटींची पूर्तता बंधनकारक झाल्याने छावणीचालक त्रस्त असल्याचेही
स्पष्टपणे लक्षात येत आहे.
जत तालुक्यात आतापर्यंत 12 चारा छावण्यांना मंजुरी मिळाली असली तरी यातील कित्येक
छावण्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. जत तालुक्यात
120 गावे आहेत. विस्ताराने मोठा तालुका आहे.
येथील शेतकरी शेती जिरायतीवर करत असल्याने त्यांना शेतीपेक्षा शेतीपुरक
व्यवसायावर अधिक अवलंबून राहवे लागत आहे. पशुपालन, कोंबड्यापालन हा मोठा व्यवसाय या तालुक्यात आहे. मात्र
सततच्या दुष्काळामुळे शेतकर्यांना पशुंचेपालन करणे जिकरीचे चालले
आहे. यंदा तर 1972 पेक्षाही मोठा दुष्काळ
पडला असल्याचे चित्र असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय यंदा तालुक्यात चारा छावण्या उशिराने सुरू झाल्याने कित्येक शेतकर्यांनी जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला आहे. शिवाय त्यातून
शेतकर्याच्या पदरात फारसे काही पडले नाही. कारण नडीला लोकांनी आणि व्यापार्यांनी कवडीमोल दराने
जनावरे बळकावली आहेत.
आता उरलेल्या
जनावरांना चारा छावण्यांचा आधार मिळाला असला तरी अजून मोठ्या प्रमाणात चारा छावण्या
सुरू करण्याची आवश्यकता आहे. याकडे प्रशासनाकडून
लक्ष दिले जावे, अशी मागणी केली जात आहे. तर चारा, पाण्याअभावी शेळ्या, मेंढ्याचे
जगणेही कठीण बनले असताना त्यांचा विचार करत शेळ्या, मेंढ्यांसाठीही
छावण्या असाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे
हणमंत कोळी यांनी केली आहे.अटींमुळे छावणीचालक बेजार
दुष्काळी स्थितीत छावण्या सुरु करणारे चालक सध्या बेजार झाल्याचे दिसून येत आहे.छावणीतील जनावरांसाठी चारा शोधण्यातच त्यांचा मोठा वेळ खर्च होत असून दुष्काळामुळे चारा उपलब्ध करताना अडचणी निर्माण होत आहेत.त्यातही चारा मिळाल्यास चारा मालक चढ्या भावाने त्याची विक्री करत आहेत.पाण्यासाठीही छावणी चालकांची पळापळ होत आहे.जनावरांना देण्याच्या खाद्याच्या तुलनेत अनुदान रक्कम तोकडी असल्याचे छावणी चालकांमधून बोलले जात आहे. अशा स्थितीतच माहितीसाठी संगणक प्रणाली, जनावरांना बारकोड, बारकोड स्कॅन करुन त्यांची मोजणी, मोबाइल अॅपचा वापर, सीसीटीव्ही या तांत्रिक बाबींमुळेही चालक वैतागले आहेत. छावणी सुरु करताना नसलेल्या अटी आता लादल्या जात असतानाच अनुदान वाटप करताना त्या अटींचा विचार होणार असल्याने छावणी चालक अडचणीत सापडले आहेत.
अनुदानातील वाढ कमी असल्याचे चालकांचे म्हणणे असून शासनाने सर्व बाबींचा विचार करुन एक मेपासून मोठे जनावर 120 रुपये व लहान जनावर 60 रुपये याप्रमाणे अनुदानात वाढ करावी, अशीही छावणी चालकांची मागणी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या तालुक्याच्या पूर्व भागात छावणीची गरज भासत आहे. मात्र छावणी सुरु करण्यासाठी कोणतीही संस्था पुढे आली नसल्याने या भागातील जनावरांची तारांबळ होत आहेत. मोठ्या जनावरासाठी चारा 15 ऐवजी 18 किलो करताना अनुदानात 90 ऐवजी 100 रुपये अशी वाढ झाली आहे. तर लहान जनावरांसाठी चारा साडेसात ऐवजी 9 किलो करताना अनुदानात 45 ऐवजी 50 अशी वाढ करण्यात आली आहे.
दुष्काळ पडल्यानंतर सर्वाधिक फटका हा कृषी क्षेत्राला बसत असल्याने मुख्यतः शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होते. शेतीतील उत्पन्नाचे स्त्रोतच बंद होऊन शेतकर्यांचे अर्थकारण कमजोर बनते. अशा वेळी पशुधन हे शेतकरी कुटुंबांचा आधार बनलेले असते. कारण दूध व्यवसायातून होणारी उलाढाल मोठी सहायक ठरते. ही वस्तुस्थिती असली तरी, यंदाच्या दुष्काळाची तीव्रता मोठी असल्याने पशुधन जगविणेच अवघड बनल्याचे वास्तव चित्र तालुक्यात निर्माण झाले. ना पाणी, ना चारा अशा संकटात जनावरे जगवायची कशी, या समस्येत अडकलेल्या बहुतांशी पशुपालकांनी जनावरे विक्रीसही काढली. मात्र दुष्काळी स्थितीमुळे खरेदीदार मिळेना, कोणी भेटलाच तर कवडीमोल किमतीला मागणी. अशा स्थितीत चारा छावण्यांची झालेली सुरुवात पशुपालकांना मोठा आधार ठरली. मात्र यात आणखी वाढ व्हावी, अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment