Sunday, May 12, 2019

जनता दुष्काळात; नेते सुकाळात


लोकप्रतिनिधी दुष्काळाबाबत आक्रमक नाहीत
जत,(प्रतिनिधी)-
 जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्ह्याला कोणी वाली राहिलेले दिसत नाही. पालकमंत्र्यांनी केवळ एक दिवस मोजक्या ठिकाणी भेटी देऊन दौर्याचा फार्स केला. प्रशासन कायद्याला धरून व नियमांवर बोट ठेऊन बसल्याचे चित्र आहे. अशावेळी जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधींनी याबाबत आक्रमक होत शासनाच्या कामास गती न देता मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या भेटी झाल्या आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील भेटी दिल्या, आढावा बैठका घेतल्या. प्रत्यक्षात फक्त जुजबी कारवाई होताना दिसत आहे.

 बैठकांचा फार्स करण्याच्या थोडं पुढे जाऊन प्रत्यक्ष दुष्काळी उपाययोजनांना कधी गती देणार, याकडे दुष्काळी जनतेच्या नजरा लागल्या आहेत. जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले आहे. टँकर मागूनही जाणीवपूर्वक दिले जात नसल्याचे चित्रही बहुतांशी गावांमध्ये आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर असताना छावण्या सुरु करण्यात जाचक अटींचा अडसर ठरत आहेत. अवघ्या तीन छावण्या सुरु असून तीन मंजूर आहेत. पालकमंत्र्यांनी गत आठवड्यात दुष्काळाचा धावता दौरा केला असला तरी प्रश्न कायम आहेत. पाणी आणि चार्याचा प्रश्न सुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 दुकाळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यात चारा आणि पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने या तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाण्यासाठी टँकर सुरू केले आहेत, तर चार्यासाठी छावण्या सुरू करण्यात येत आहेत. यासह इतर उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यात 174 गावे आणि हजारावर वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी देण्यात येत आहे, तर आटपाडी येथे दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. कवठेमहांकाळ येथे छावणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जतलाही पाच छावण्या मंजूर आहेत, पण 118 गावांच्या तालुक्यात पाच छावण्या कुठे पुरणार असा सवाला उपस्थित होत आहे.
सध्या जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाची भाषणता जत तालुक्यात आहे. 123 गावांपैकी तब्बल 86 गावे आणि 650 वाड्या-वस्त्यांमध्ये दोन लाख 15 हजारावर लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. चार्याचीही परिस्थिती गंभीर आहे. परंतु लालफितीच्या कारभारात प्रस्ताव येऊन चारा छावण्यांना मंजुरी दिली गेली नाही. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी परवा धावता दौरा केला.
मंत्र्यांच्या दौर्यानंतरही पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चार्याची टंचाई आहे. चारा आणि पाण्याविना जनावरांचे हाल होत आहेत. शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगत प्रशासनाकडून दुष्काळी सुविधांची अंमलबजावणी झाली नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास दुष्काळाच्या भयंकर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment