Sunday, May 19, 2019

माडग्याळमध्ये बसस्थानक परिसरात होतेय वारंवार वाहतूक कोंडी


जत,(प्रतिनिधी)-
जत-उमदी या राज्यमार्गावर असलेल्या माडग्याळ (ता. जत) येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी फोडण्याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. त्यामुळे वाहनधारकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.
माडग्याळ येथे ही वाहतूक कोंडी सततची डोकेदुखी झाली आहे. दर शुक्रवारी माडग्याळ येथे भाजीपाला आणि जनावरांचा मोठा बाजार भरतो. या आठवडा बाजारदिवशी होणार्या वाहतूक कोंडीने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दिवसंदिवस वाढणारे अतिक्रमण याला कारणीभूत असून ग्रामपंचायत आणि प्रशासनाने हे अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे. नेहमी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे,पण पोलिस नेहमी गायबच असतात. माडग्याळ (ता.जत) येते शुक्रवारी आठवडी भाजीपाला आणि जनावरांचा बाजार भरतो. गेल्या शुक्रवारी सुमारे दीड किलोमीटर ट्रॅफिक जाम झाले होते. दुचाकी विस्कळीतपणे लावल्या होत्या. त्यातच मध्येच दुचाकी घुसत असल्याने मोठ्या वाहनांना बसस्थानकाचे ठिकाण पार करायला सुमारे दोन तास प्रतीक्षा करावी लागली.अर्थात हे इथले नेहमीचे चित्र आहे. वाहतूक हाताळायला कोणतीच पोलीस अथवा इथली ग्रामपंचायतीची यंत्रणा उपस्थित नव्हती. वाहतूक कोंडी त्यातून लोकांना होणारा विलंब चीड आणणारा होता, त्यातच रस्त्याच्या एका बाजूला गटारीचे काम सुरू असल्याने त्यात आणखी भर पडली होती.
 मध्यंतरी येथील अतिक्रमणे काढण्यात आली होती,पण पुन्हा ही अतिक्रमणे झाली आहेत. हा जत-उमदी- चडचणला जायला हा एकच राज्य मार्ग आहे. या मार्गावरून सोलापूर, मंगळवेढा, चडचण वाहने जातात.त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. मोटारसायकली कशाही रस्त्यावर अडव्या-तिडव्या लावणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. बाजाराच्यादिवशी पोलिस दुसर्याच जुळणीला लागत असल्याने या बाजारातल्या कोंडीकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय या वाहतूक कोंडीकडे लोकप्रतिनिधीपासून प्रशासनापर्यंत सगळ्यांचीच उदासीनता संताप आणणारी आहे.
(माडग्याळ येथे गटारीचे काम आणि दुचाकी वाहने अस्ताव्यस्त रस्त्यावर लावल्याने सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.)

No comments:

Post a Comment