Monday, May 20, 2019

रोजगार हमीची कामे बंद; मजुरांचे स्थलांतर


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली असून प्रशासन मात्र लालफितीच्या कारभारात दंग आहे. शेतकर्यांची व शेतमजुरामधील दरी दुष्काळाने संपली आहे. दुष्काळामुळे शेतमजुरांची काम शोधत कर्नाटकात विटव्यवसायासाठी भटकंती सुरू आहे. मोठ्या तालुक्यातील मजुरांचे स्थलांतर झाले असून वृद्ध मजुरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

आयुष्यभर कष्ट केलेल्या दुष्काळी पट्ट्यातील या जनतेचे आयुष्याच्या संध्याकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. असे एक धक्कादायक व दयनीय चित्र निर्माण झाले आहे. जत तालुक्यातम्हैसाळचे पाणी आले असते तर तीस ते पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असते. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जत तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावे वगळता तालुक्याच्या एकाही गावातम्हैसाळचे पाणी मात्र आले नाही. जत तालुक्यातील शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. या भागात कोरडवाहू क्षेत्र पेरणीनंतर पाऊस आला नाही. पावसाचे प्रमाणही अत्यल्प असल्याने जनता भरडली जात आहे. अनेक शेतकरी आपली शेती घरच्या घरी करून मजुरी वाचवत आहेत, तर काही ठिकाणी द्राक्षाची शेती असल्याने त्या ठिकाणी मजुरांना काम मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी द्राक्ष, डाळिंबाच्या बागायतदार मजुरांनाही आता काम मिळेनासे झाले आहे.
पूर्व भागातील अनेक गावातील मजूर आता बाहेरगावी मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत. मजुरांना रोजगार हमीची कामे तर मिळतील, अशी आशा होती, मात्र ते काम सध्या बंद पडल्याचे दिसते; तर अनेक शेतकरीही शेतात पाणी नसल्याने हाताला काम नाही. त्यांचीही कामासाठी धडपड सुरू आहे. पण सध्या तालुक्यात कुठेही मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध नाहीत. तालुक्याची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या आसपास असून मोठ्या प्रमाणात कुटुंबेही दारिद्य्ररेषेखाली आहेत. वर्षभर मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होती. ठेकेदार व पंचायत समितीच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे ही कामे या बंद असून जत पंचायत समितीमधील 12 अधिकार्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक अधिकारी हा नवीन कामे करण्यास तयार नाही. या भ्रष्टाचारामुळे मात्र कामे बंद असल्याने मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत.

No comments:

Post a Comment