Friday, May 31, 2019

उच्च रक्तदाबामुळे मृत्यू व अपंगत्वाचा धोका!

जत,(प्रतिनिधी)-
उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा 'सायलेंट किलर' समजला जातो, कारण, या आजाराची निश्‍चित अशी लक्षणे नसतात. पण, त्यामुळे कार्डिओव्हस्क्युलर तसेच अन्य गुंतागुंतीचे विकार होऊ शकतात आणि मृत्यूही येऊ शकतो. भारतात 4 पैकी एका पुरुषाला, तर 5 पैकी एका स्त्रीला उच्च रक्तदाबाने ग्रासल्याची माहिती एका सर्व्हेक्षणातून पुढे आली आहे.

मे महिना हा 'उच्च रक्तदाब शिक्षण महिना' म्हणून पाळला जातो. हायपरटेन्शन हे अन्य अनेक आजारांचे कारण आहे. हायपरटेन्शनवर उपचार झाले नाहीत, तर त्यामुळे मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होणे किंवा मूत्रपिंड, हृदय व डोळ्यांच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. सर्व प्रौढ, तरुण, वृद्धांनी आपला रक्तदाब मोजून घ्यावा आणि त्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपचार घ्यावेत. महाराष्ट्रातील 15 ते 49 या वयोगटातील 17.9 टक्के प्रौढांना हायपरटेन्शन आहे, असे नुकतेच एका अभ्यासाअंती समोर  आले आहे.
रक्तदाब म्हणजे, रक्तप्रवाहामुळे रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांवर पडत असलेला दाब. उच्च रक्तदाब हा महाराष्ट्रात मृत्यू व अपंगत्वासाठी कारणीभूत ठरणार्‍या धोक्याच्या घटकांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर एकंदर चौथ्या क्रमांकाचा धोक्याचा घटक आहे.
१८ वर्षांवरील तरुणांनीही दोन वर्षांतून किमान एकदा डॉक्टरांकडून रक्तदाब तपासून घ्यावा. वय, जीवनशैली, कौटुंबिक इतिहास, तणाव या सर्वांमुळे रक्तदाब वाढू शकतो. आणि हा रक्तदाब बर्‍याच काळासाठी वाढलेला राहिला, तर रक्तवाहिन्यांची हानी होते . यातून हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक तसेच मूत्रपिंड व डोळ्यांचे आजार अशा गंभीर समस्या निर्माण होतात, असेही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment