Thursday, May 9, 2019

पाणी, चार्‍यासाठी दुष्काळग्रस्तांचा टाहो

अनेक राजकीय पक्ष,संघटनांचे आंदोलनाचे इशारे
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पाणी व चार्‍याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व भागातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. जनावरे चार्‍यासाठी तडफडत आहेत. पिकांची होरपळ सुरू आहे. सिंचन योजनाद्वारे तलाव भरून देऊ, असे आश्‍वासन देणारे नेते निवडणुकीनंतर गायब झाले आहेत. दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी गावो-गावी टँकरची संख्या वाढविणे, चारा छावण्या मोठ्या प्रमाणात सुरू करणे हाच उपाय आहे. पण शासन व प्रशासन याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. यामुळे दुष्काळी जनतेतून संतापाची लाट उसळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस,रिपब्लिकन पार्टि यांच्यासह अनेक संघटनांनी दुष्काळाच्या उपाययोजना करा,यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.डफळापूरचे माजी पंचायत समिती सभापती मन्सूर खतीब,बाबासाहेब माळी यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. खुद्द भाजपच्या नेत्यांकडूनही उपाययोजना करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनीही  हीच मागणी केली आहे.
दरम्यान,विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्यासह पशुधन मंत्री महादेव जानकर,पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तालुक्याचा दौरा केला आहे,मात्र उपाययोजना होताना दिसत नाहीत. गुडडापूर येथे फक्त चारा डेपो सुरू करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी आहे.मात्र प्रशासन म्हणावे असे गतिमान होताना दिसत नाही.
वाढत्या तापमानामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यातील  पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. तलावातील पाणी वेगाने आटत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील 179 अधिक गावे व  1071 वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच  दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. खानापूर, तासगाव, कडेगाव, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जत तालुक्यात सर्वात जास्त  पाणीटंचाई जाणवत आहे. म्हैसाळ योजनेतून काही भागात पाणी पोहोचले असले तरी त्याचा पूर्ण तालुक्यांना फायदा होताना दिसत नाही. तालुक्यातील 86 गावे व 650 वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  हीच स्थिती आटपाडी तालुक्यात आहे. टेंभूचे पाणी शिवारात आले असले तरी, टंचाई कायम आहे. निवडणुका असताना सिंचन योजना सुरू होत्या. पण आता त्या बंद आहेत. यामुळे पिकांची होरपळ सुरू आहे.
शेतकर्‍यांचा दबाव वाढला की कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. टँकरची मागणी असतानाही ते दिले जात नाहीत. तलाव भरण्याची मागणी फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आली होती. प्रशासन व शासनाने याबाबत आश्‍वासनही दिले होते. पण निवडणुका संपताच नेत्यांनी पाठ फिरविली आहे. पाणीप्रश्‍नांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. यामुळे लोकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. चार्‍याविना दुष्काळी तालुक्यांमध्ये जनावरांचे हाल सुरू आहेत. चार्‍याची उपलब्धता केवळ नदीकाठावरील तालुक्यांत आहे. पण उसाचा दरही तीन हजार रुपये गुंठा असा झाला आहे. हा दर सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे गोठ्यातील जनावरे आता बाजाराकडे निघाली आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी जनावरे पड्या दराने मागत आहेत.
2012 मध्ये करण्यात आलेल्या पशुगणनेनुसार  सांगली जिल्ह्यात 6 लाख 67 हजार 635 मोठी आणि 1 लाख 66 हजार 545 लहान जनावरे आहेत, तर 4 लाख 82 हजार 22 शेळ्या आणि मेंढ्यांची संख्या आहे. एकूण 13 लाख 16 हजार 202 जनावरे आहेत. या पशुधनाला जगवण्यासाठी दररोज दोन लाख 90 हजार 770 टन ओला चारा, तर 1 लाख 16 हजार 306 टन वाळलेला चारा लागतो.  सध्या जिल्ह्यामध्ये किरकोळ चारा शिल्लक आहे. पुढील दीड ते दोन महिने कसे काढायचे, हा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.
“पाणी व चारा टंचाईमुळे आता दुष्काळग्रस्तांना जगणे मुश्कील झाले आहे. पिण्यासाठी पाणी नाही, तर जनावरांसाठी पाणी कुठून मिळणार. जितराबांचा बाजार करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या जाचक नियमामुळे टँकर व चारा छावण्या सुरू करणे अवघड बनले आहे. अनेक गावांत पाण्यासाठी राजकारण केले जात आहे.  शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात. टँकरची संख्या वाढवावी. सिंचन योजनाव्दारे तलाव भरून द्यावेेत.”
    - सुशीला होनमोरे,माजी जि.प.सदस्या

No comments:

Post a Comment