शेतकऱयांचे चेहरे काळवंडले;दुष्काळाच्या झळा तीव्र
जत,(प्रतिनिधी)-
रणरणत्या उन्हात शेतकऱयांचे चेहरे काळवंडले दिसत आहेत.41 अंशापेक्षा अधिक तापमानात अंगाची लाही लाही होत असतानाच सर्वदूर फक्त उन्हाचे चटकेच बसत आहेत. या उन्हाच्या चटक्याबरोबरच चारा,पाणी यांचा दुष्काळ असल्याने शेतकऱ्याच्या मनाला बसणारे चटके याहीपेक्षा तीव्र आहेत. शासकीय मदत, चारा छावण्या,पाण्याचा टँकर लोकांपर्यंत पोहचत नसल्याने जत तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या हालखीत जीवन जगत आहेत. आम्हाला कोणी वाली आहे का, असा सवाल विचारला जात आहे.
वर कोरडे स्वच्छ आभाळ आणि खाली जमिनीला उन्हाचे चटके बसत असल्याने हाताला काम नसलेल्या मंडळींना घराबाहेर पडणेदेखील मुश्किल झाले आहे. लोकांच्या हाताला काम नाही, शेतात पीक नाही आणि जनावरांना चारा-पाणी नाही, अशा भीषण अवस्थेत येथील लोक जगत आहेत. काही शेतकऱयांनी आपली जनावरे आपल्या पाहुण्या रावळ्यांकडे सोडून पोटाची खळगी भरायला अन्य शहरांचा आसरा घेतला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर झाले आहेत. उन्हाचे चटके, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याला येथील जनता वैतागली आहे, अजून दोन महिने कसे काढायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.
मे महिन्याचे ऊन फारच त्रासदायक ठरत आहे. तापमानाचा पारा 41 अंशा च्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी प्रमाणे पाचवीला पुजलेला दुष्काळ चटके दयायला लागला आहे. अशा गंभीर परिस्थितीत राजकारणी आणि प्रशासन तालुक्याकडे बघायला तयार नाहीत. जत तालुक्यात 118 गावांपैकी 86 गावांना 106 टँकर द्वारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातही या अनियमित पाण्याच्या टॅंकरला लोक वैतागले आहेत. त्यामुळे साहजिकच घरात पाणी नसेल तेव्हा रानोमाळ भटांकती करण्याशिवाय लोकांना पर्याय राहिला नाही. टँकर चालकांवर कितीही कडक नियम लादले तरी ते सहज जुगारून मोकळे होतात, अशी परिस्थिती आहे.
जत तालुक्यातील मोजक्याच 10- 12 गावाला उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहचले आहे. बाकी गावांमध्ये पाण्याचा ठणाणाच आहे. त्यामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक निवडणूक काळात पाणी देण्याचे आश्वासन दिले जाते,मात्र ते आश्वासन निवडणुकीनंतर विरून जाते. लोकांना शेवटी स्वतः च पर्याय शोधावा लागतो.आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अभूतपूर्व दुष्काळ पडला असताना जनावरांना चारा ,पाणी उपलब्ध नसताना पालकमंत्री सुभाष देशमुख आणि पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी तालुक्याचा फक्त धावता आढावा घेतला आणि चारा छावण्या सुरू करण्याचे आश्वासन देऊन गेले. जिल्हाधिकारी तर सामाजिक संस्थांनी चारा छावण्या सुरू करण्याबाबत फक्त आवाहन करताना दिसत आहेत. चारा छावण्या सुरू करायला घातलेल्या जाचक अटी पाहून संस्था पुढे यायला तयार नाहीत. शासन जनावरे जगवण्यासाठी कुठलेच प्रयत्न करताना दिसत नसल्याने शेतकरी आपली जनावरे कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना विकत आहेत. स्वतः च्या खाण्याचे वांदे झाले असताना जनावरे कशी पोसायची असा प्रश्न लोकांपुढे पडला आहे.
No comments:
Post a Comment