Sunday, May 19, 2019

ऊस क्षेत्र घटल्याने येत्या हंगामात साखर उत्पादनाचा फटका

जत,(प्रतिनिधी)-
गेल्या मोसमी पावसाळ्यात पर्जन्यराजाने समाधानकारक हजेरी न लावल्याने राज्यात ऊस लागवड थंडावली असल्याने तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी ऊस पिकाचा चारा झाल्याने 2019-20 च्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार असल्याचे चित्र असून सुमारे पंचवीस  टक्क्यांपर्यंत साखर उत्पादनात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि हा अंदाज साखर उद्योगावर दुरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

अगोदरच साखर कारखानदारी दरामुळे अडचणीत असताना अवर्षणामुळे ऊस लागवड मंदावली आहे व जो उपलब्ध आहे तो ऊस चार्यासाठी वापरला जात असल्याने आता 2019-20 च्या हंगामात साखर कारखान्यांसमोर ऊस टंचाईचे संकट आ वासून उभे राहिले आहे. यामुळे आता कारखान्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर या ऊस पट्ट्यात हे संकट जास्त आहे. येथे पाणीटंचाईमुळे ऊस लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे.
 दुष्काळामुळे ऊस शेती धोक्यात येत असून आहे त्या उपलब्ध पाण्यात काटकसरीने पीक घेता यावे यासाठी आता पाटाने पाण्याऐवजी ठिबक सिंचनाला आणखी महत्त्व देण्याची वेळ आली आहे. ठिबक सिंचनचा वापर शेतकर्यांनी करावे,यासाठी सरकारने यावरील बजेट येत्या अर्थसंकल्पात वाढवण्याची गरज आहे. प्रतिवर्षी ठिबकसाठी 5 हजार कोटी रूपये सरकार अनुदानापोटी खर्च करते. आता यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ठिबकने पाणी दिल्यास सहा हजार हेक्टर क्षेत्रासाठी एक टीएमसी पाणी वापरता येऊ शकते तर पाटाने पाणी दिल्यास एक टीएमसी पाण्यात चार हजार हेक्टर ऊस भिजतो. हे प्रमाण पाहता सरकार ठिबकवरील जास्त खर्चाला मान्यता देण्याची गरज आहे.
हंगामात पंधरा ते वीस टक्के ऊस कमी पडून साखरेचे उत्पादन हे 80 लाख टनावर येण्याची शक्यता आहे. येणारा पावसाळाही यासाठी महत्त्वाचा असून वेळेत पाऊस पडला तर शेतात उभ्या असणार्या ऊस पिकाला पाणी मिळेल.
राज्यातल्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठे होऊ न शकल्याने उसाचा चारा मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील चारा छावण्यांना ऊस पुरविला जात आहे. याचा परिणाम पुढील हंगामावर होईल. महाराष्ट्रात 9 लाख 42 हजार हेक्टरवर ऊस पिकविला जातो. परंतु यंदाच्या दुष्काळाने यात मोठ्या प्रमाणात घट होईल. पाणीटंचाईमुळे दोन ते अडीच लाख हेक्टरवर ऊस लागवड न झाल्याचा अंदाज आहे. याची माहिती आता संकलित केली जात आहे.
देशातील एकूण साखरेच्या किमान 35 टक्के साखर एकट्या महाराष्ट्रात तयार होते. यामुळे येथील साखर उद्योगावर देशाचे लक्ष असते. 2018-19 चा गळीत हंगाम आता संपला असून येथे 100 लाख टन साखरेेचे उत्पादन झाले आहे. 2017 मध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली होती व याचा परिणाम सरत्या हंगामात उसाची उपलब्धता जास्त होती. यासाठी ऑक्टोबर महिन्यातच साखर कारखाने सुरू करण्यात आले होते. यामुळे हा हंगाम लवकर संपला आहे. देशपातळीवर या सुरू असणार्या 2018-19 च्या हंगामात साखरेचे उत्पादन किमान 330 लाख टन होईल असा अंदाज आहे. तर पुढील हंगामात यंदाच्या दुष्काळाचा परिणाम म्हणून तीस लाख टन साखर कमी उत्पादित होऊन 2019-20 मध्ये 300 लाख टनावर साखर निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच शेजारच्या कर्नाटक राज्याच्या अनेक भागात दुष्काळ पडलेला आहे व याचा परिणाम ऊस शेतीवर झालेला आहे. यामुळे येणारा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम हा या उद्योगासाठी कसरतीचा असणार आहे. राज्यात 2018 च्या पावसाळ्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली व साखरेचे जास्त उत्पादन घेणार्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर भागात ऊस शेती धोक्यात आली आहे.

No comments:

Post a Comment