Thursday, May 16, 2019

जत तहसील कार्यालयावर 20 रोजी शेतकर्‍यांचा जनावरांसह मोर्चा

लक्ष्मण जखगोंड यांची माहिती
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. 1972 पासून या तालुक्यात दुष्काळाची परंपरा कायम आहे. चारा डेपो, पाण्याचे टँकर तालुक्यात वेळेवर मिळत नाहीत. जत तालुक्याच्या गावागावांमध्ये वाडी-वस्तीवर पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. जत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये चारा छावणी सुरू करावी आदी मागण्यांसह सोमवार, दि. 20 रोजी सकाळी अकरा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जत तहसील कार्यालयावर शेळ्या-मेंढ्या व जनावरांसह मोर्चा काढणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण जखगोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोर्चासाठी वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये जत तालुका हा प्रामुख्याने दुष्काळी तालुका म्हणून 1972 पासून दुष्काळाच्या खाईत आहे. सध्या या तालुक्याला गेल्या वर्षभरापासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जत तालुक्याच्या गावागावांमध्ये वाडी-वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा हा वेळेत करण्यात यावा. प्रत्येक गावात चाचणी सुरू करण्यात यावी. शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात यावी. शेतकर्यांना तातडीची मदत म्हणून शासकीय सर्व योजना राबविण्यात याव्यात. जत तालुक्यातील शेतकर्यांचे सर्व वीजबिल माफ करण्यात यावे. शेतकर्यांचे कर्जमाफी करण्यात यावी.
जत तालुक्यातील सर्व गावांमध्ये कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात यावे. सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची म्हैसाळ योजनेमधून पाईपलाईन करण्यात यावी आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील जनता दुष्काळाशी दोनहात करीत आहे. वर्षानुवर्षे म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी आश्वासनांशिवाय शासनाने काही केले नाही. त्यामुळे तालुक्यातील जनताम्हैसाळच्या पाण्यापासून वंचित आहे. यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी भाऊसो दुधाळ, दादासाहेब पांढरे, धनाजी गडदे, विवेक टेंगले, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment