Wednesday, May 29, 2019

मान्सूनची वाटचाल संथ; पेरणीला घाई नको!

जत,(प्रतिनिधी)-
मे संपत आला तरी अद्याप अंदमानात दाखल न झालेल्या मान्सूनची वाटचाल यंदा संथ राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यात तो उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर उन्हाचा ताप आणि पाणी टंचाईचे चटके यात रोजचीच भर पडत आहे.
दरम्यान, मान्सूनच्या होणार्‍या विलंबामुळे शेतकर्‍यांनी कुठलीही घाई न करता हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार शेतीची कामे करावीत, असे आवाहन कृषी खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
साधारणत: २0 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर १ जूनपर्यंत तो केरळात येतो. ८ जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मात्र, हे वेळापत्रक बदलणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मान्सून अंदमानात पोहोचला असला तरी अजूनही अंदमानातील काही भाग त्याने व्यापलेला नाही.  त्यानंतर तो केरळात दाखल होण्यासाठी ६ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता सध्या दिसत नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्याची चिंता नागरिकांना वाटू लागली आहे. त्यातच कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चर्चा आणि त्यासाठी राज्य शासनाने 30 कोटींची केलेली तरतूद याचीही भर पडली आहे.
त्याचबरोबर मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीच्या कामाची घाई करू नये, राज्यात मे अखेरपर्यंत तापमानाचा पारा चढा राहणार असून जूनमध्ये तो कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे थोडा दिलासा मिळणार असला तरी पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकर्‍यांनी शेतीची पेरणीपूर्वी कामे सुरू करावीत. मान्सून उशिराने दाखल होणार असला तरी शेतकर्‍यांनी काळजी करू नये. मशागतीची कामे पूर्ण करावीत. हवामान खात्याच्या सल्ल्यानुसारच पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

No comments:

Post a Comment