Friday, May 17, 2019

नव्या शासन परिपत्रकावरून शिक्षकांच्या वेतनास विलंब नको


 शिक्षक संघाची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांची एप्रिलची वेतन बिले ही सर्व तालुक्यांकडून सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2016 या तारखेवर वेतन निश्चिती करून दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहेत. परंतु 14 मे रोजी सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती संदर्भात शासनाकडून स्पष्टीकरण प्राप्त झाले आहे. या स्पष्टीकरणाचा विचार करता काही शिक्षकांच्या पगारात सध्याच्या बिलानुसार तफावत निर्माण होते. ही तफावत दूर करून पुन्हा नव्याने पगार बिले तयार करून सर्व तालुक्यांकडुन जिल्हा परिषदेला प्राप्त होण्यासाठी पुन्हा विलंब होऊ शकतो.त्यामुळे पगार अगोदर करावा, अशी मागणी होत आहे.

 सध्या एप्रिलच्या वेतनाला मुळातच विलंब झाला आहे. त्यात आणखी विलंब झाला तर बँक कर्ज व्याजामुळे अनेक शिक्षकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे 1 जानेवारी 2016 या तारखेवर वेतन निश्चिती करून पाठवलेली ही सर्व वेतन बिले अंतिम करून एप्रिलचा पगार लवकरात लवकर करण्यात यावा व मे महिन्याचे वेतन करत असताना 14 मे 2019 च्या शासन परिपत्रकातील स्पष्टीकरणा नुसार काही शिक्षकांची कमी जास्त फरक रक्कम किंवा वसुली रक्कम निश्चित करून मे महिन्याच्या वेतनात घालण्यात यावी, अशा प्रकारची विनंती उपमुख्यकार्यकारी अधिकारी निलेश घुले व शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल माने, राहुल पाटणे, अनिल भोळे, कृष्णनाथ ढोबळे, संजय शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment