Sunday, May 12, 2019

गाडीचे हेडलाईट देतात अपघाताला निमंत्रण


अप्पर-डिप्पर प्रणालीचा वापर बंधनकारक असावा
जत,(प्रतिनिधी)-
 रात्र होताच गाड्यांच्या लाईटचा चकचकाट डोळ्यांना भिडू लागतो. डोळ्यावर पडणार्या या तीव्र प्रकाशामुळे अपघात होण्याचे प्रमाण अनेक पटीने वाढू लागले आहे. गाडी चालविताना अचानक डोळ्यावर तीव्र प्रकाश पडल्यामुळे डोळे दीपून जातात. त्यामुळे काही क्षण चालकाला काहीही सुचत नाही. नेमके याच स्थितीमुळे अपघात होतात.

सायंकाळ होताच चालक गाडीचे लाईट लावतात. पण ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पथदिवे आणि आसपासच्या इमारतीत चकाकणारे दिवे असतात, तिथे गाडी चालकांनी गाडीचे दिवे लावण्याची फारशी आवश्यकता नसते. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश रस्त्यावर खाली पडावा आणि त्यामुळे रस्त्यात असलेल्या गाड्यांपासून रक्षण करता यावे, यासाठी हेडलाईट गाडीला लावलेले असतात. समोरून येणार्या वाहनाला इशारा करण्यासाठी अप्पर लाईटची व्यवस्था केलेली असते. त्यासाठी गाडीच्या हेडलाईटला अप्पर आणि डिप्पर असे दोन भाग असतात. लाईट डोळ्यावर पडून अपघात होऊ नये यासाठी अप्पर लाईटला काळा रंग लावणे अपेक्षित असते. पण लोक तसे करीत नाही. त्यामुळे डोळ्यावर तीव्र प्रकाश पडून लोक अपघातात बळी पडतात. रस्ता पार करणारे आणि मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसतो. तीव्र प्रकाशामुळे काही क्षणांसाठी लक्ष विचलित होते आणि अपघात होतो.
बरेचदा दोन गाड्या एकाचवेळी येत असतात, त्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे वाहनचालकाला नेमका अंदाज लागत नाही. यामुळे वाहतूक नियमांमध्ये अप्पर आणि डिप्पर लाईट प्रणालीचा वापर करणे, त्यासाठी लोकांना जागृत करणे गरजेचे झाले आहे. हेलमेट सक्तीचा चांगला परिणाम आपल्याला अनुभवायास येत आहे, तशीच हेडलाईट अप्पर-डिप्पर योजना राबविल्यास अपघातांवर नियंत्रण करणे सोपे होईल. आजकाल सर्वत्र विकासकामे सुरू असल्याने रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशावेळी अपघातांना आवरण्यासाठी असे प्रयत्न केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल.

No comments:

Post a Comment