जतच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले असल्याने तालुक्याच्या पूर्व भागातही पाण्याची आशा वाढल्याने जतच्या मतदारांनी खासदार संजय पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. खासदार पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या बरोबरीने सुमारे 46 हजारांचे मताधिक्य दिले आहे. जतच्या लोकांना पाणी आणि विकासकामे हा महत्त्वाचा मुद्दा वाटू लागला आहे.
जत तालुक्यातील नागरीक व शेतकऱ्यांची जीवनदायीनी असलेल्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून खासदार संजयकाका पाटील यांनी तालुक्याच्या दक्षिण - उत्तर भागातील मुख्य कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून त्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेतली आहे .याशिवाय काही भागात प्रत्यक्षात पाणी पोचवले आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक त्यांच्या या कामाबद्दल समाधानी होते. त्याचा फायदा त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला आहे .जत तालुक्यातल्या जनतेला नेमके काय हवे,हे तिच्या आतापर्यंत च्या वाटचालीवरून लक्षात येते.
रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी खा.पाटील यानी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेवून त्याचा पाठपुरावा केला आहे. जत तालुका भाजपा अंतर्गत असलेला टोकाचा संघर्ष मिटवून त्यांनी सर्वांना एकत्रित प्रचारासाठी आणले होते. मतदानावर त्याचा कोठेही परिणाम होवू दिला नाही.
2014 मध्ये खासदार पाटील यांना सुमारे एक लाखाचे मताधिक्य जत तालुक्यातून होते.यात यात निम्म्याने घट झाली आहे.गेल्या वेळी मोदी हवेची लाट होती. यावेळी ही हवा काही प्रमाणात कमी झाली असली तरी यात खासदार पाटील यांच्या विकास कामाचे योगदान आहे. आणखी एक महात्त्वाचे म्हणजे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या पाठीमागे जनाधार असला तरी गाव पातळीवर कार्यकर्त्यांमधील एकवाक्यता त्यांच्यात दिसून आली नाही .पक्ष संघटन व पक्षाचा कार्यक्रम आणि ध्येयधोरणे ग्रामीण भागात पोचण्यासाठी त्यांना अपयश आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळागाळात परिचित असलेले हात हे निवडणूक चिन्ह नव्हते. हातावर डोळे झाकून मतदान करणाऱ्या काही मतदारांची अडचण झाली. सत्ताधारी पक्षाने जे चुकीचे काम केले असेल ते काम आम्ही सत्तेत आल्यानंतर करणार नाही असे ठासून सांगण्यात त्यांना यश आले नाही. याशिवाय प्रचार यंत्रणेतील एकवाक्यतेचा अभाव त्यांच्यात दिसून येत होता. त्याचा फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून बसला आहे .आगामी विधानसभा निवडणुकीत जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची निवडणूक जत तालुक्यातील तरुणांनी हातात घेऊन प्रचार यंत्रणा राबवली होती. कोणीही नेता अथवा नेतृत्व त्यांच्याकडे नव्हते .सर्वसामान्य तरुण व कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते ,एका विशिष्ठ समाजातील तरुणांची मदत घेऊन त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली. त्यामुळे या निवडणुकीला जातीय रंग दिला जात आहे, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर केला जात होता .जत विधानसभा मतदार संघातून प्रथमच पडळकर यांना मिळालेले भरभरून मतदान येथील प्रस्थापितांना धक्का देणारे आहे,असे येथे मानले जात आहे. त्यामुळे यापुढील काळात जत विधानसभा मतदारसंघात भाजप , काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी किंवा चौरंगी राजकीय सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
काँग्रेस , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस व इतर राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेची साखरपेरणी केली आहे , परंतु कोणत्याही पक्षाने उमेदवार निश्चित केले नाहीत तरीही विद्यमान आमदार विलासराव जगताप , डॉ. रवींद्र आरळी , तम्मनगौडा रविपाटील हे भाजपकडून तर काँग्रेसकडून विक्रम सावंत हे प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. आता वंचित आघाडीची यात भर पडण्याची शक्यता आहे.
विधानसभेवर काय परिणाम
सन २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती त्याचा फायदा भाजपा उमेदवारांना झाला होता. या लोकसभा निवडणुक निकालाचे जत तालुक्याच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहेत. जत तालुक्यातील ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद व नगर पालिका आणि सहकारी सोसायटीत भाजपा व काँग्रेसची जवळपास समसमान प्रमाणात सत्ता आहे. यापुढील काळात भाजपचे कार्यकर्ते उचल खाणार आहेत. त्यामुळे ताब्यात असलेल्या संस्थेतील सत्ता टिकवून ठेवताना विरोधकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment