Monday, May 20, 2019

ज्वारी महागल्याने भाकरी झाली दुर्मिळ


जत,(प्रतिनिधी)-
गेल्या दोन वर्षांपासून जत,सांगोला,मंगळवेढा, बार्शी या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ज्वारीचे आगार असलेल्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. याचा परिणाम ज्वारीच्या दराच्या वाढीत झाले आहे. 20-22 रुपये प्रतिकिलो मिळणारी ज्वारी 32 ते 35 रुपये किलो दराने विकली जात आहे. यामुळे लोकांनी ज्वारीपेक्षा गव्हाला पसंदी दिल्याने ग्रामीण भागात ज्वारीची भाकरी दुर्मिळ झाली असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात भाकरी दही, चटणी, कांदा ही सकाळची न्याहरी ठरलेली असायची. मात्र आता ज्वारीचे दर वाढल्याने शेतकरी कुटुंबात ही आता पॅकिंग गहू आट्याची चपातीच खाण्याची वेळ शेतकर्यावंर आली आहे. जिथे ज्वारी खंडीने पिकायची, तिथेच आता भाकरी -भाकरी म्हणण्याची वेळ आली आहे. बार्शी, लातूर, उस्मानाबाद, मराठवाडा; कर्नाटकाच्या काही भागात शाळू नंद्याळ, कार ज्वारी हायब्रीड यांचे पीक अमाप असते, त्यामुळे हायब्रीड प्रतिकिलो 18 रुपये असतो. नंद्याळ 20 रुपये किलो असतो. शाळू बर्यापैकी 25 रुपये व बार्शी एक नंबरचा शाळू 28 किंवा 30 रुपये किलो असतो. पण या शाळूचा दर 42 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला असल्याने आज शेतकरी ही ज्वारी विकत घेऊ शकत नाही. मंगळवेढा हे ज्वारीचे आगार, तर उस्मानबाद ज्वारीला जीआय दर्जा मिळाला आहे. या भागातील शेतकर्यांनी पाऊस नसतानाही ज्वारी पेरणी केली. खर्चाचा जुगार खेळला. परंतु पावसाअभावी पेरे वाया गेले. कर्ज- बाजारीपणा  पदरात पडला.
या परिसरात ज्वारीचे पीक चांगले आले तर येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारीमध्ये घरात शिल्लक असलेली ज्वारी विकत असते. त्यामुळे त्या काळात ज्वारीचा दर तसा कमीच असत. परंतु यंदा मात्र पिकाचे काही खरे नाही, याची कल्पना आल्यावर शेतकर्यांनी जुना साठा विक्रीस काढला नाही. पर्यायाने ज्वारीची टंचाई निर्माण झाली व डिसेंबर महिन्यापासून दर गगनाला गेले, तर कडबा शेकडा तीन हजार रुपये दर सुरू झाला. त्यामुळे जनावरांना तो एवढ्या महाग दराने परवडणारा नाही. पाणस्थळ पट्ट्यातील शेतकरी नेहमी हळद ऊस, ढबू मिरची, ज्वाला मिरची टोमॅटो व इतर फळभाज्या, पालेभाज्या यांच्याकडे लक्ष असतो. तो खरीप किंवा रब्बी हंगामात या ज्वारीचे पीक कधीच घेत नाही. तो नेहमी ज्वारी उन्हाळा लागण्यापूर्वी विकत घेतो.
पण सध्या या दराचे चित्र पाहिल्यामुळे गहू, गव्हाचा तयार आटा, बाजरी, नाचणी विकत घेऊन ज्वारीची भूक कशीतरी भागविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या मात्र खरं तर भाकरीचा चंद्र दुर्मिळ बनत चालला आहे. घरातील वयस्कर लोकांना ग्रामीण परिसरात भाकरी असल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही. ज्यांना भाकरी शिवाय दुसरे जेवण चालत नाही, त्यांचे मात्र हाल होत आहेत. ते बिचारे कुठे तांदळाची, नाचणीची, बाजरीची भाकरी खाऊन दुधाची भूक ताकावर भागविताना दिसत आहेत. शासनस्तरावरून ज्वारीसाठी खास प्रयत्न करण्याची आज गरज भासत आहे. कारण शेतीप्रधान देशात शेतकर्यांचे मुख्य अन्न आमटी भाकरी आहे. त्याचा तुटवडा असेल तर इतर गोष्टीतील प्रगतीच्या गप्पा हा नुसता भपका आहे.

No comments:

Post a Comment