Sunday, May 12, 2019

मार्गावरील मैलाच्या दगडाचे अस्तित्व संपुष्टात


जत,(प्रतिनिधी) -
खेडेगावातील रस्त्यापासून ते राष्ट्रीय महामार्गावर दिमाखात उभ्या असलेल्या मैलाच्या दगडाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. काळाबरोबर अनेक बदल झाले, त्यातील हा एक मोठा बदल म्हणावा लागेल. मैलाचा दगड म्हणजे एक गावाची ओळख होती. मैलाच्या दगडाच्या ठिकाणाला तसेच नाव पडले आहे. आज ते दगड अस्तित्वात नसले तरी त्या नावावरून अनेक ठिकाणांना आजही ओळखले जाते. आज मैलाच्या दगडाची जागा किलोमीटरने घेतली आहे.

एक हजार 760 यार्ड म्हणजे एक मैल अशी मोजपट्टी होती. दरम्यानच्या काळात बदल झाला आणि मैलाचे रूपांतर किलोमीटरमध्ये झाले. त्यामध्ये एक मैल म्हणजे 1.61 किलोमीटर, तर एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर असे मोजमाप आता रूढ झाले आहे. आजही काही रस्त्यावर मैलाचा दगड पाहायला मिळत आहे. पिवळ्या,पांढर्या रंगाने रंगवविलेल्या दगडावर काळ्या अक्षरात गावाचे नाव आणि अंतर लिहिलेले असायचे. आजही ते सिमेंटने बनविलेल्या दगडावर किलोमीटरचे अंतर लिहिलेले पाहायला मिळत आहे. पिवळा-पांढरा रंग असलेला मैलाचा दगड ही एक गावची जुनी ओळख होती, तशी आजही काही ठिकाणी आहे. मैलाचा दगड तसा साधारण तीन ते चार फूट उंचीचा तर फर्लांग किंवा यार्डचा दगड दीड-दोन फूट उंचीचा होता. या दगडावर शून्य आकडा दिसला की गाव आलंच म्हणून एक मोठं समाधान मिळायचं, अशी पोक्तमंडळी आज सांगत आहेत.
 विकासाच्या प्राथमिक अवस्थेत मैलाच्या दगडाचे महत्त्वही तसे मोठे होते. आजही अऩेक नोंदी मैलावरूनच ओळखल्या जात आहेत. आता मोजमापाची पद्धत बदलली असली तरी, ज्येष्ठ मंडळी अमूक गाव सहाव्या मैलावर किंवा दोन-तीन फर्लांग गेला की पुढे वस्ती आहे, तर नव्या जमान्यात 10 व्या किलोमीटरवर आमचे गाव आहे, असे सांगतात. एकेकाळी रस्त्याने जाताना वाटेतच मैलाचा दगड दिसला की, त्यावर अमूक गाव आणि त्यावर आकडा लिहिलेला असायचा, जसा आज किलोमीटरच्या दगडावर लिहिलेला आहे. आज दगडासारख्या सिमेंटच्या कोरीव बनविलेल्या ठोकळ्यावर किंवा गावाच्या आसपास रस्त्यावर लावलेल्या फ्लेक्सवर अंतर दर्शविले आहे. प्रत्येक गावात आता फ्लेक्स लावले आहेत, त्यावर गावापासून पुढचे प्रमुख गाव किती किलोमीटर आहे, याची माहिती आणि दिशा दाखविलेली पाहायला मिळत आहे. खेड्यापाड्याच्या ठिकाणी सामान्य माणसाच्या मनात घर करून बसलेला हा मैलाचा दगड शहरातही आकर्षण ठरत आहे. मात्र, अलीकडच्या पिढीला त्याची माहिती देण्यापुरतासुद्धा मैलाचा दगड शिल्लक राहिला नाही.

No comments:

Post a Comment