जत,(प्रतिनिधी)-
सातव्या वेतनानुसार तालुका स्तरावरून बिले आल्यास तातडीने पगार दिला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. निशादेवी वाघमोडे- बंडगर यांनी दिली. या शिवाय अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात आंतरजिल्हा बदली होऊनही खुल्या प्रवर्गाच्या जागा रिक्त नसल्याने अनेक शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात बाहेरून येता आले नाही. मागील वर्षी कार्यमुक्त होऊ न शकलेल्या आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना यावर्षी जागा रिक्त झाल्या असल्याकारणाने " कार्यरत जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यासाठी " सांगली जिल्हा परिषदेने लेखी पत्र द्यावे अशी मागणी करण्यात आली.
भविष्य निर्वाह निधीचे तक्ते तात्काळ मिळावे अशी मागणी केली असता कडेगाव व आटपाडी तालुक्यांचे शेड्युल्ड अद्याप प्राप्त झालेले नाहीत. सर्व रकमा सॉफ्टवेअर मध्ये भरून लवकरच तक्ते तयार करून मिळतील, असे सांगण्यात आले. परिविक्षाधीन कालावधी प्रस्तावाचा पाठपुरावा केला असता, 241 शिक्षकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सामान्य प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत.त्यातील एक दोन शिक्षकांच्या त्रुटी वगळता सर्व प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळेल. तसेच आणखी 148 प्रस्ताव पूर्ण असून तेही मंजुरीसाठी लवकरच सामान्य प्रशासनात पाठविण्यात येतील.
रँडम राऊंड मधील गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या सोयी करण्यासंदर्भात चर्चा केली असता मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी 13 तारखेला चर्चा करण्याचे ठरले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे युवानेते धैर्यशील पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी , जिल्हा कोषाध्यक्ष अमोल माने, प्रसाद जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment