Thursday, May 9, 2019

धक्‍कादायक... राज्यात रोज 8 शेतकरी करतात आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
समृद्ध महाराष्ट्रातील शेतकरी मात्र दु:खाच्या छायेत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 2014 ते 2018 या पाच वर्षांच्या काळात  14034 शेतकर्‍यांनी जीवन संपवले आहे. राज्य सरकारने 2017 साली जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेनंतरही 4500 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

सरासरी रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
देशात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात, हे आता सार्‍या जगाला माहीत झालेले भयाण वास्तव आहे. ‘लँड ऑफ सुसाईड’ असे भीषण वर्णन अभ्यासकांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्येसंदर्भात करून ठेवले आहे. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये विदर्भातील शेतकर्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठवाडा व इतर परिसर दिसून येतो. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी माण-खटाव, तसेच सांगलीतील जत, आटपाडी कवठेमहांकाळ तसेच कोल्हापुरातही काही भागातील शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे मृत्यूस कवटाळले आहे.
दुष्काळामुळे शेतकरी पुरता पिचतो हे सत्य आहेच, याशिवाय उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी मोबदला मिळत असल्याने शेतकर्‍यांमधील कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे. बँका, पतसंस्थांसह सावकारांचे अव्वाच्या सव्वा व्याज शेतकर्‍यांच्या एकदा मानगुटीवर बसले की ते उभ्या आयुष्यात फिटत नाही. याचा परिणाम परिस्थितीने खचलेला व पिचलेला शेतकरी मरण जवळ करत असल्याचे दिसते. जानेवारी 2011 ते डिसेंबर 2014 या चार वर्षांत महाराष्ट्रात 6,268 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तर 2015-2018 या चार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा जवळजवळ दुप्पट झाला आणि 11,995 पर्यंत इतका गेला आहे.
... ही आहेत आत्महत्येची  कारणे
कर्ज, पिकांचे सतत नुकसान, उधारी-उसनवारी देणेकर्‍यांचा दबाव, मुलीच्या लग्‍नासाठीचा हुंडा, धार्मिक कारणांसाठींचा खर्च, आजारपण आदी कारणांनी शेतकरी कर्जबाजारी होऊन जीवन संपवत असल्याची माहिती राज्य सरकारने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाला कळवली आहेत.
सरकार बदलले तरी आत्महत्यांमध्ये घट नाही
काँग्रेस आघाडीचा केंद्र सरकारातील पाच वर्षांचा काळ आणि यानंतर भाजप आघाडीची पाच वर्षे अशा पद्धतीने मी माहिती जमा केली. यातून असा निष्कर्ष काढता येतो की, कोणतेही सरकार आले किंवा गेले तरी महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये घट दिसत नाही. उलट वाढ होत असल्याची प्रतिक्रिया पुणे येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिली. घाडगे यांनी याबाबतची माहिती मागवली होती..
निवडणुकीत शेतकरी आत्महत्या मुद्दा गौण
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम संपत आहे. निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय आणि राजकीय नेत्यांची भाषणे सुरू आहेत. मात्र, एकमेकांवर वैयक्‍तिक टिकाटिप्पणी करणार्‍या राजकीय नेत्यांकडून शेतकरी आत्महत्या हा मुद्दा गौण ठरवण्यात आला असल्याचे प्रचारातून दिसते. त्यामुळे शेतकरी वर्गाला वालीच नाही, अशीच स्थिती तयार झाली आहे.

No comments:

Post a Comment