Sunday, May 26, 2019

घोंगडी खरेदीकडे ग्राहकांची पाठ


जत,(प्रतिनिधी)-
जतसह कवठेमहांकाळ, सांगोला, खानापूर, आटपाडी भागात मोठ्या प्रमाणात मेंढीपालनाचा व्यवसाय केला जातो. मोठ्या प्रमाणात पुर्वीपासून शेळ्यामेढ्यांचे कळप आढळतात. काहीजणांच्या तर पूर्ण चरीतार्थच या व्यवसायावर चालत असतो. मेषपालनाबरोबर त्याठिकाणी लोकर कताईचाही दुय्यम व्यवसाय केला जातो. लोकरीपासुन उत्कृष्टरीत्या घोंगडी व जेनची निर्मिती होत असते. परंतू सध्याच्या आधुनिक जमान्यात तयार धाटणीतील रग, चादर व ब्लँकेट चा सर्रास वापर होत असल्याने घोंगडी व जीनची मागणी कमी आहे. ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे.

 धनगर समाजाच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असणारे शेळी मेंढी पालन व त्यापासुन दुय्यम रित्या निर्माण केली जाणारी जेनची निर्मितीही प्रक्रिया कष्टाची असून भर उन्हात लोकर कातरली जाते व ती पिंजून काळी, पांढरी वेगवेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावरुन सुत कातले जाते. त्यानंतर ते खळीमध्ये (चिंचोक्याच्या) ती रात्रभर भिजवले जाते. त्यामध्ये इतर ही काही घटक मिसळले जातात. सदर प्रक्रिया केलेल्या चार ते पाच किलो लोकरीतून एक घोंगडी तयार होते. लोकर ही मेषापासून वर्षातून दोन वेळा उत्पादीत केली जाते. एक जानेवारी दरम्यान दुसरी जुलै- ऑगस्टच्या दरम्यान तयार मालाला 800 ते 1000रु.पर्यंत दर मिळत असतो. पुर्वी मागणी प्रमाणे त्यांची लांबी रुंदी ठरते व त्याप्रमाणातच त्याची किंमत होत असते. घोंगडीचा वापर हा विविध आजारालाही मात्रा ठरत असून त्यामुळे वाताच्या विविध आजारावरही उपयोगी पडते. मात्र अलिकडच्या लोकांना याची फारशी कल्पना नाही.
 पुर्वी घोंगडी व जेन प्रत्येकाच्या घरात आर्वजुन दिसत. यावरच बैठका होत असत. लग्नाच्या सुपारी कातरल्या जात. पाहुण्यांचा पाहुणचारही याच घोंगड्यावर होत असे परंतु सध्या हे चित्र दुरापास्त झाले असून त्याची जागा आधुनिक ब्लँकेट चादरी व रगांनी घेतली आहे. सध्या घोंगडी व जेनचे दर्शनच दुर्मीळ झाले आहे.
घोंगडी दिसते ते फक्त किर्तनाच्या वेळी, किर्तनकारांच्या पायाजवळ. त्यामुळे हा व्यवसायच संकटात आला आहे. अनेक आजारांना दूर ठेवणार्या घोंगड्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सततच्या दुष्काळाने मेषपालन करणे कसरतीचे झाले आहे, त्या मेंढ्यापासून मिळणार्या लोकरीची मागणी त्याचबरोबर त्याचबरोबर त्यापासून निर्माण केलेल्या घोंगडीला दर तर नाहीच पण मागणी ही कमी झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय मर्यादित झाला आहे. काही व्यावसायिकांनी या धंद्याला रामराम ठोकून अन्य व्यवसाय करण्याकडे वळले आहेत.

No comments:

Post a Comment