Monday, May 13, 2019

पत्नीच्या घरी नांदणार्‍या शिक्षकासह चौघांची निर्दोष मुक्तता


  जत,(प्रतिनिधी)-
 मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला कर्मचारी असलेल्या पत्नीचा छळ केला व तिच्या अंगावर ज्वालाग्रही पदार्थ टाकल्याच्या आरोपातून शिक्षक पतीसह चौघांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.के. शेख यांनी दिला.

 सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचा रहिवासी असणार्या परंतु लग्नानंतर सांगोला तालुक्यात पत्नीच्या घरी नांदायला आलेल्या शिक्षक पती, त्याचे आई-वडील व शिक्षक मित्राच्या या खटल्याची हकीकत अशी की, केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या पत्नीने शिक्षक पतीला लग्न जमताना अशी अट घातली होती की, ती नोकरीनिमित्त माहेरी राहणार व सुटीदिवशी सोयीनुसार ती सासरी जाणार. ठरलेल्या अटीप्रमाणे लग्नाच्या दुसर्या दिवसापासून शिक्षक पती आपल्या पत्नीच्या घरी नांदण्यास गेला. काही दिवसांनंतर मोटारसायकल घेण्यासाठी व लग्नात मानपान केला नाही म्हणून पतीसह तिचे सासू- सासरे आणि पतीचा शिक्षक मित्र यांनी जाचहाट चालू केला. तसेच 22 ऑगस्ट 2015 रोजी तिच्या अंगावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून तिच्या जीवाला धोका निर्माण केला, अशी फिर्याद पत्नीने सांगोला पोलीस ठाण्यात दिली होती. 
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, महिला अत्याचारविरोधी कायद्याचा दुरुपयोग करुन पती व सासरच्या लोकांना कसा त्रास दिला जातो, याचे ही केस म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे. या प्रकरणातला पतीच पत्नीकडे नांदण्यास होता. 8 दिवसांपूर्वी पतीच्या भावाचे अपघाती निधन झाले असतानादेखील पत्नीने तिचा वाढदिवस साजरा केला. भावाच्या मृत्यूच्या दुःखात व सुतकामध्ये असलेल्या पतीला वाढदिवसाचा केक आणायला लावला. पतीला सोलापूरला नोकरी लागली. त्यामुळे त्याने पत्नीला सोलापूरला बदली करुन घ्यावी, असे सांगितले. त्यास तिने नकार दिला व दबाव टाकण्यासाठी तिने पूर्णपणे खोटा खटला पती व सासरच्या लोकांवर दाखल केला आहे. पती व सासरच्या लोकांना छळणार्या पत्नीला शिक्षा करण्याबाबत नवीन कलम कायद्यात समाविष्ट करण्याची अत्यंत गरज आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी पतीसह चौघांची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींतर्फे अॅड. धनंजय माने, ॅड. जयदीप माने, ॅड. सिध्देश्वर खंडागळे, ॅड. मिसाळ, ॅड. विकास मोटे यांनी काम पाहिले.  

No comments:

Post a Comment