जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील खेड्यापाड्यातून, गावांगावांतून लीलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी, १ जून रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सगळ्या ५६८ बसस्थानकावर मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे.
राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या तसेच गोरगरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे.
३० लाकडी बॉडी असलेल्या बेडफर्ड बसेस घेऊन महामंडळाचा प्रवास सुरु झाला. आज या एसटीचा विस्तार वाढला असला तरी समस्यासुद्धा तितक्याच निर्माण झाल्या आहेत. अलीकडच्या वर्षात एसटी सातत्याने तोट्यात चालली आहे. सरकारी मदतीच्या अपेक्षेवर चाललेली एसटी आज खासगी वाहनांच्या प्रतिस्पर्धेत आपले अस्तित्व आणि महत्व टिकवून आहे.
पहिल्यांदा एसटी सुरू झाली तेव्हा पुणे -नगर रस्त्याची तिकीट ९ पैसे एवढी होती. कालांतराने महामंडळाने अनेक बदल करत एसटीच्या सुविधा वाढविल्या. लाकडी ऐवजी आता अल्युमिनियम बॉडीच्या बस आल्या. कुशन असलेल्या सीट वापरण्यात आल्या आणि १९५६ पासून रातराणी सेवा सुरु करण्यात आली. निळ्या रंगाच्या बस आता लाल झाल्या आहेत. १९८२ साली एशियन गेम सुरु असताना निम आराम बस सुरु करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे एसटीचे सहा विभाग आहेत.
आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे 15 हजार 550 वाहने आहेत. त्यामध्ये साध्या बसगाड्यांची संख्या 14 हजार 22, शहर बसगाड्या 651, निम आराम बसगाड्या 544, मिनी बसगाड्या 199, डिलक्स बसगाड्या 48 आहेत. याशिवाय अधिकारी वर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामार्गाकडे आहेत.
अलीकडेच शिवशाही नावाने काही बसेस दाखल झाल्या आहेत. या शिवशाही बसमध्ये 47 आसन आहेत, लॅपटॉप मोबाईलची सोय, एलईडी स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. एकूण 1500 शिवशाही बसेस या वर्षाअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक वाड्यावस्त्या आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे एसटीच आहे. एसटीकडून मराठी दिन बरोबरच अनेक उपक्रम राबवले जातात. असे असले तरी या एसटीला अनेक अडचणी, समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एसटीचा पसारा इतका वाढला आहे आणि शासनाच्या विविध सवलतीच्या योजना आहेत,त्यामुळे एसटीला सातत्याने तोट्याला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचाऱयांचा पगार ही मोठी समस्या आहे. त्यांची सातत्याने आंदोलने होता आहेत.गळक्या गाड्या हीसुद्धा एक समस्या आहे. अपुरा कर्मचारी असल्यामुळे गाड्या वेळेवर दुरुस्त होत नाहीत,त्यांची देखभाल होत नाही. साहजिकच गाड्या वाटेत बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. नादुरुस्त साहित्य लवकर मिळत नाही. त्यामुळे एसटी गाड्यांकडे प्रवाशी दुर्लक्ष करून खासगी वाहनांना पसंदी देत आहे.
प्रवाशी लोकांचीही एसटी वाचवण्यासाठी थोडी फार जबाबदारी आहे. गावात इतर सुविधा,खासगी गाड्या यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कित्येक गावातल्या गाड्या महामंडळणे बंद करून टाकल्या आहेत. त्यामुळे आपापल्या गावात एसटी चालू राहिली पाहिजे,यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजे. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.
No comments:
Post a Comment