Tuesday, May 7, 2019

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच चारा छावण्या मंजूर:तहसीलदार पाटील

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात अद्याप पर्यंत एकही  चारा छावणी मंजूर करण्यात आली नाही लोहगांव ( ता.जत ) येथील चारा छावणीचे दोन प्रस्ताव आले आहेत त्यांचा मंजुरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे .आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता त्यांच्याकडून झाल्यानंतर चारा छावन्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत . अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली .

      चारा छावणी सुरु करण्यासाठी सहकारी संस्थेने दहा लाख रुपये अनामत रक्कम किंवा तेवढ्याच रकमेचे खेळते भागभांडवल आहे असा  बँकेचा दाखला देणे बंधनकारक केले होते .या नियमात शासनाने शिथिलता आणून दहा लाख ऐवजी पाच लाख रुपये अनामत करण्यात आली आहे . चारा छावणीचे प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून घेवून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून देण्यात येणार आहेत असेही सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले.
      चारा छावणी सुरु करण्यासाठी शासनाने  परिपत्रकात एकवीस जाचक अटी घालून दिलेल्या आहेत या जाचक अटीमुळे चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणतीही सहकारी संस्था अथवा स्वयंसेवी संस्था पुढे येण्यास धजत नाही . सन २०१५ मधील टंचाई कालावधीत जत तालुक्यात एक चारा डेपो चालक व सोळा चारा  छावणी चालकांच्या विरोधात व्यवहारातील तफावत व इतर तांत्रिक कारणामुळे महसूल विभागाने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत .याचा निकाल अद्याप लागलेला नाही त्यामुळे तालुक्यातील एकही सहकारी संस्था व स्वयंसेवी संस्था किंवा खाजगी चारा छावणी चालकाने यावर्षी चारा छावणी सुरू करण्यासाठी महसूल विभागाकडे  अर्ज दाखल केले नाहीत असे समजते .
     दोनच दिवसांपूर्वी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तालुक्यातील अचकनहळ्ळी , वायफळ , मुचंडी , दरीबडची या भागाचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली व तालुक्यात दोन चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत अशी  घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात एकही  चारा छावणी मंजूर झाली नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी केलेली घोषणा फसवी व पशुधन मालकांची दिशाभूल करणारी आहे. अशी  प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिकातून उमटत आहे.
     सांगली जिल्हा पालकमंत्री सुभाष देशमुख व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यानी जत तालुक्यातील दुष्काळी भागाचा पाहाणी दौरा  स्वतंत्रपणे केला आहे .परंतु कोणताही ठोस निर्णय त्यांच्याकडून झाला नाही. तालुक्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. चारा छावणीचे प्रस्ताव आता तयार करून दिले तर  मंजुरीसाठी त्याला कमीत कमी एक महिना लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होईल त्यामुळे मंत्री मोहदय फक्त फार्स करण्यासाठी आले होते काय ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment