Tuesday, May 7, 2019

जत तालुक्यातील 17 तलाव कोरडे ठणठणीत


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात भीषण दुष्काळ जाणवत असून पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य आहे. तालुक्यातल्या तलावांमध्ये फक्त 2 टक्के पाणीसाठा असून 28 तलावांपैकी तब्बल 17 तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढत असून सध्या 86 गावांनामधील सव्वा दोन लाख लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

 सांगली जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता वाढत आहे. मध्यंतरी तीन दिवस पारा काहीसा खाली आल्याने उन्हाचे चटके कमी झाले होते. परंतु सोमवारपासून पुन्हा पारा वाढू लागल्याने दुष्काळाची दाहकता अधिकच जाणवू लागली आहे. मुख्य प्रश्न आहे, तो पाण्याचा आणि जनावरांच्या चार्याचा. या जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला वरदान ठरणार्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या तीनही योजनांच्या कालव्यांचे काम जिथपर्यंत झाले आहे, तिथपर्यंत पाणी पोहोचवताना मध्ये येणारे मध्यम आणि लहान तलाव भरुन घेतले जात आहेत. तरीही या घडीला जिल्ह्यातील मध्यम आणि लघु अशा एकूण 84 प्रकल्पांपैकी तब्बल 32 प्रकल्प कोरडे पडले आहेत. 23 प्रकल्पांचा केवळ एक लहानसा झरा होऊन बसला आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, आटपाडी, तासगाव, मिरजेचा पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत आदी सात तालुक्यांना दुष्काळाच्या झळा बसतात. त्यातल्या त्यात जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांची अधिक होरपळ होते. पाणी आडवून ते जमिनीत मुरवावे आणि उर्वरित पिण्यासाठी, जनावरांसाठी उपयुक्त ठरावे म्हणून मध्यम आणि लघु प्रकल्प पाटबंधारेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहेत. अशा प्रकल्पांची सर्वाधिक संख्या 28 इतकी एका जत तालुक्यात आहे. त्यापाठोपाठ आटपाडी तालुक्यात 13 आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 11 इतके प्रकल्प आहेत. कडेगाव तालुक्यात 7, खानापूर तालुक्यात 8, तासगाव तालुक्यात 7, शिराळ्यात 5, मिरजेत 3 आणि वाळव्यात 2 असे जिल्ह्यात एकूण 84 प्रकल्प आहेत. पलूस तालुक्यात मात्र एकही असा प्रकल्प नाही.
जत तालुक्यातील प्रकल्पांमध्ये गतीवर्षीच्या एप्रिल अखेर 29 टक्के इतका पाणी साठा होता. तो यावर्षी अवघा 2 टक्के इतका आहे. या तालुक्यातील 28 पैकी 17 प्रकल्प पूर्णतः कोरडे पडलेत तर 8 प्रकल्पांतील पाणी मृतसाठ्याच्याही खाली गेले आहे. आटपाडी तालुक्यातील 13 पैकी 5 कोरडे आणि 5 तलावातील पाणी अखेरची घटका मोजत आहे. गतवर्षी एप्रिल अखेर या तालुक्यातील प्रकल्पांमध्ये 23 टक्के इतका साठा होता. यंदा तो 5 टक्क्यांवर आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील 11 पैकी 3 कोरडे पडलेत, 5 मधील पाणी म्हणजे एक झरा होऊन बसले आहे.

No comments:

Post a Comment