Sunday, November 4, 2018

वॉट्सअप,फेसबूकच्या जमान्यात भेटकार्डे झाली दुर्मिळ


जत,(प्रतिनिधी)-
अलिकडच्या काही वर्षात संपर्काची माध्यमे बदलली. त्याला गती आली. त्यामुळे जुन्या काळातली काही संपर्क माध्यमे दुर्मिळ होत आहेत.काही हद्दपार झाली आहेत. सध्या सोशल मेडिया पॉवरफुल्ल बनला आहे. त्याने भेटकार्डांची जागा घेतली आहे. साहजिकच दिवाळी,पाडवा, नव्या वर्षाची सुरुवातीला शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा कार्डांचा वापर केला जायचा आता,त्याच्यावर संक्रांत आली आहे. ही भेटकार्डे आता दुर्मिळ झाली असून फक्त मोठ मोठ्या संस्था, व्यक्ती यांच्यापुरत्याच त्या सीमित राहिली आहेत.

सध्या प्रकाशाचा सण दिवाळी सण उत्साहात सुरू आहे. या दीपावलीच्या सणानिमित्त आपल्या आप्तेष्टाना, मित्रांना, नातेवाईकांना, व्यावसायिक हितचिंतकांना, ग्राहकांना दिवाळी भेटकार्डांच्या - शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. आजही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात , मात्र या शुभेच्छा देण्याचे माध्यम बदलले आहे. -मेल, व्हॉट्सअप, मोबाईल, फेसबुक, इंटरनेट यामुळे दिवाळी भेटकार्डे - शुभेच्छा पत्रे इतिहासजमा झाली नसली तरी दुर्मिळ झाली आहेत ही वस्तुस्थिती आहे. आता फक्त भेटकार्डाच्या आठवणी राहिल्या आहेत.
 पूर्वी दिवाळीचा सण जवळ आला कि, शहरात जागोजागी भेटकार्ड विक्रीची दुकाने थाटली जायची. मात्र त्या काळात तयार ग्रीटिंग्ज पेक्षा हाताने स्वतः तयार करून भेटकार्ड पाठविण्याची प्रत्येकाचीच धडपड असायची. यासाठी कार्डशीट आणले जायचे, रंग आणले जायचे, स्केच पेन आणली जायची व रात्री चारचार तास भेटकार्डे बनवायचा उद्योग घरोघरी सुरु असायचा. वेगवेगळ्या कल्पना कार्डशीटवर उतरवून एकापेक्षा एक अशी सुंदर दिवाळी भेटकार्डे तयार व्हायची. सरकारी पोष्टात मिळणारे दहा पैशाचे पोस्टकार्ड आणून त्यावर ग्रीटिंग तयार करणार्यांची संख्याही मोठी होती. आपल्या जवळच्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने शुभेच्छा पात्र तयार करण्यातला आनंद काही औरच असायचा व त्या शुभेच्छा पत्रात माया, ममता, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ओथंबून भरलेला असायचा.
भेटकार्ड तयार करायचे, ते वेळेत पोस्टात टाकायचे आणि पोस्टमन आपल्यासाठी आणणार्या दिवाळी भेटकार्डांची वाट पाहायची हे पूर्वी दिवाळीतील सर्वात आनंदाचे क्षण असायचे. काळ बदलला, आधुनिक तंत्रज्ञान आले, लाखो दिवाळी शुभेच्छा काही सेकंदात पाठविण्याची सोय झाली. इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक, -मेल याद्वारे चोवीस तास एकमेकांच्या संपर्कात असणारे दिवाळी शुभेच्छांसाठी देखील साहजिकच त्याचाच वापर करू लागले. मात्र यामुळे दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यात मजाच निघून गेली. मोबाईलवर शुभेच्छांचा भडीमार सुरु झाला, शुभेच्छांचा पाऊस पडू लागला. मात्र या आधुनिक तंत्रज्ञांनाच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा या कोरड्याच राहिल्या. या शुभेच्छांमधून प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा सगळेच गायब झाल्याचे जाणवते. या वेगवान युगात आजही काही मंडळींनी दिवाळी भेटकार्डे - शुभेच्छा पत्रे तयार करून हा आनंद जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे हे विशेष. त्यामुळेच या आधुनिकतेच्या तंत्रज्ञानामुळे दिवाळी कार्डे इतिहासजमा झाली आहेत असे म्हणता येणार नाही, मात्र ती दुर्मिळ झाली आहेत हे निश्चित.

No comments:

Post a Comment