Sunday, November 4, 2018

सहा खासगी सावकारांना अटक सांगली


जत,(प्रतिनिधी)-
 परिस्थितीचा फायदा घेऊन खासगी सावकारी करताना अव्वाच्यासव्वा व्याज आकारणी करुन वसुलीसाठी धमकावणार्या सहा सावकारांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या सहाही जणांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिरज तालुक्यातील हरिपुरात राहणारे आणि चप्पल तयार करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे विजय विठ्ठल मोरे यांनी काहीजणांकडून रोकड घेतली होती. ज्यांनी मोरे यांना पैसे दिले ते सहाही जण बेकायदेशीर सावकारी करण्यात माहिर असून वेळप्रसंगी घरात घुसून संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरतात, जीवे मारण्याची धमकी देतात, याचा प्रत्यय मोरे यांना आला.
या सावकारांच्या व्याज आकारणीच्या पध्दतीमुळे कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड करणे गोरगरीबांना शक्यच होत नसल्याचे समोर आले आह संबधित सावकारांनी घरात घुसून कुटुंबाला धमकावल्यानंतर मोरे यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. त्यांची तक्रार घेऊन पोलिसांनी बेकायदेशीर खासगी सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्या सावकारांना गजाआड केले आहे. यामध्ये आकाश उर्फ गजानन परशराम साळुंखे (वय 32, हरीपूर), संदीप उर्फ अविनाश शिवाजी जाधव (वय 30, कवठेपिरान), मुकुंद गोविंद शिंदे (वय 44, हरिपूर रस्ता), अनंत उर्फ आनंदा बाबुराव जाधव (वय 38, पंचमुखी मारुती रोड, सांगली), ऋषीकेश उर्फ भैय्या परशराम साळुंखे (वय 25, हरिपूर) आदींचा समावेश आहे. या सर्वांना अटक करुन पोलिसांनी शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. इंदलकर यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्या सहाही जणांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment