अश्विन वद्य त्रयोदशी
म्हणजेच धनत्रयोदशी. हा दिवाळीतील दुसरा दिवस आहे. या दिवशी धनाची व कुबेराची पूजा करतात. काही ठिकाणी विष्णू,
लक्ष्मी, योगिनी, गणेश,
नाग व द्रव्यनिधी या देवतांचेही पूजन करतात. पूर्वीच्या
काळी धनत्रयोदशी ते पाडवा एवढेच दिवस दिवाळी साजरी केली जात असे. राजा हेमचंद्र याल पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा भविष्यवाणी झाली व असे सांगितले
गेले की लग्नानंतर चौथ्या दिवशी त्याचा मुलगा मरण पावेल. साहजिकच
राजाने मुलाला जन्मापासूनच जीवापाड जपले; परंतु सोळाव्या वर्षी
त्याचा विवाह झाला आणि त्यानंतर चौथ्या दिवशी तो मरण पावला. यमदूताला
त्याचा तो आक्रोश पाहवेना.‘असा अपमत्यू झाल्यावर जीव घेऊनयेतानादुःख
होते’असे यमदूताने यमदेवास सांगितले. त्यावर
यमराजांनी उपाय शोधला व असे सांगितले.
जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करेल त्याला
व त्याच्या कुटुंबीयांना अपमृत्यू येणार नाही. तेव्हापासून धनत्रयोदशीला
दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. यालाच यमदीपदान असे म्हणतात.
यमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी उंचावर दिवे लावण्याच्या पद्धतीवरूनच आकर्षक
आकाशकंदील वापरण्यास सुरुवात झाली असे मानतात. या दिवशी पहाटे
उठून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन वस्तू, कपडे देवासमोर ठेवून हळदकुंकू वाहतात. पूजेत केशरी व
लाल झेंडूची फुले प्रामुख्याने वापरली जातात. या दिवशी धने व
गूळ यांचा नैवेद्य जरूर दाखवावा. काही ठिकाणी ओल्या नारळाच्या
करंजीचा तसेच पायसम् किंवा खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. प्रसादात
धने वापरण्यामागे आरोग्यवर्धक असे कारण आहे. दिवाळीत थंडीला प्रारंभ
होतो. त्यामुळे शरीराला ऊब देणार्या,
तेलातुपात बनविलेल्या पदार्थांचे सेवन जास्त होते. त्याने पित्त होऊ नये म्हणून धने पोटात जाणे आवश्यक आहे.
धने थंड
असतात व पित्त कमी करण्याचे काम करतात. धन्याचे पाणी खडीसाखर
घालून प्यायल्यास पित्त व उष्णता कमी होते. त्यामुळे आरोग्याच्या
दृष्टीने विचार करून दिवाळीच्या सुरुवातीलाच धने वापरण्यास सांगितले आहे. धनत्रयोदशीच्या पूजेत पिवळ्या कोरांटीच्या फुलाला अतिशय महत्त्व आहे.
कोरांटीचे पिवळे फुल अत्यंत दुर्मिळ असून, सहसा
मिळत नाही. त्यामुळे कोरांटीच्या फुलाला सोन्याचे फूल समजतात.
यादिवशी दानधर्म करणे पुण्याचे असते असेही म्हटले जाते. प्रत्येकाने यथाशक्ती दानधर्म करावा असे सांगितले जाते. सोनेखरेदीला या दिवशी ऊत येतो. अशा या दीपावलीची खर्या अर्थाने सुरुवात करणार्या धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

No comments:
Post a Comment