Sunday, November 4, 2018

दिवाळीतील विशिष्ट हालचाली आणि आरोग्य


दिवाळीच्या दिवसांत अनेक कामे, अनेक विशिष्ट हालचाली या अशा असतात, ज्या जास्त करून अमलात आणल्या जातात व त्यामुळे आपल्या शरीराला व आरोग्याला फायदा होतो. अभ्यंगस्नान - दिवाळीतील चार दिवस आनंदाने साजरा करण्यासाठी पहाटे लवकर उठून तेल-उटणे अंगाला लावून गरम पाण्याने स्नान (अंघोळ) करतात. तेल-उटण्याने त्वचा मऊ होते, तसेच चांगली तजेलदार दिसते. तेल-उटणे लावताना अंग चोळले जाते. त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा जातो. तसेच गरम पाण्यानेदेखील शरीराला आराम मिळतो. शिवाय सकाळी थंडी असल्याने गरम पाण्याने थंडी कमी होते. दुसर्या व्यक्तीला तेलउटण्याने चोळताना नकळत चोळणार्या व्यक्तीचा व्यायाम होतो. खांद्यापासून त्याच्या हाताची हालचाल होते. कंबरेत वाकणे होते.

रूढी परंपरा : घरचा नैवेद्य - सणवार म्हटले की रूढीपरंपरा, चालीरीती या आल्याच. आपल्या नकळत या जोपासताना आपल्या अनेक अशा हालचाली होतात, ज्या आरोग्याला फायदेशीर ठरतात.
सडा-रांगोळी : प्रथेप्रमाणे आपण घरासमोर रांगोळी काढतोच. गावात आजही शेणाने सारवून मग रांगोळी काढली जाते. यामध्ये सतत वाकणे, खाली बसणे, हाताचा वापर करताना तो स्थिर धरणे इ. गोष्टी होतात. ज्याने चरबी घटण्यास मदत होते. इमारतीत वास्तव्य करताना घराबाहेर काहीजणी गेरूने रंगवतात व मग रांगोळी काढतात. त्यानेदेखील वरील फायदा होतो.
नैवेद्य : स्वयंपाकातील पुरणाचा मान. पूर्वी पुरण घरी वाटले जायचे. मग पुरणपोळी करायचे. तसेच कोणतेही लागणारे पीठ घरी जात्यावर दळले जात असे. दिवाळीतील पदार्थांना लागणारे पीठ, नैवेद्यासाठी लागणार्या स्वयंपाकातील बाकीच्या गोष्टी, मसाले इ. सर्व घरीच केले जायचे. त्यामुळे पाठीचा, मानेचा, खांद्यापासून सर्व हातांना, काही वेळेस पायांचा व्यायाम होत असे. आजही आमच्या घरी नैवेद्याला घरचे लागते. लक्ष्मीपूजनाला लागणार्या करंज्या घरीच कराव्या लागतात. म्हणजेच परंपरा जपत हे घरीच केले जाते. ज्यामुळे थोड्या प्रमाणात असेल; पण व्यायाम हा होतोच.
दागिन्यांचे महत्त्व : आरोग्याच्या दृष्टीने सणवार म्हटले की, दागिने हे हवेतच ! सध्या एकदा चढवलेले दागिने कोणी रोज वापरत नाही. झोपताना, अंघोळ करताना हे दागिने अंगावरच असतात. सोने व चांदी तसेच हिरे-मोती हे दागिने जेवढे आकर्षक असतात, तेवढेच ते आरोग्यदायीदेखील असतात. सोने व मोत्यांचे पाणी अंगावर पडले, की शरीर स्वच्छ होते. सोने व चांदी हे शरीरातील उष्णता शोषून घेतात.
एकत्र कुटुंबपद्धत महत्त्वाची : सणावारात व इतर वेळेसही थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आशीर्वाद घेताना आपण नमस्कार करतो. ज्यामुळे खाली वाकून लगेच वर उठावे लागते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असल्याने, रोज मोठ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे. आजही दिवाळीच्या दिवसांत नातेवाइकांकडे जाणे होते. तेव्हादेखील आपण नमस्कार करतो. फटाके उडवताना, भुईचक्र-अनार लावताना पण नकळत आपले खाली वाकणे होते. फटाका लावताना मन एकाग्र होते. रादर ते करावे लागते. आजूबाजूच्या वातावरणाने मन प्रसन्न होते.

No comments:

Post a Comment