Saturday, November 3, 2018

जत नगरपालिकेला प्रशस्त इमारतीची प्रतीक्षा


 जत,(प्रतिनिधी)-
जत येथील नगरपालिकेची इमारत कार्यालयीन कामकाजासाठी अपुरी पडत आहे. कामासाठी येणार्या नागरिकांना उभे राहण्यासाठीदेखील जागा नसल्याने त्यांना व्हरांड्यात येऊ उभे राहावे लागत आहे. वारंवार अपुर्या इमारतीचा विषय समोर येऊनही नगरपालिकेचे पदाधिकारी गप्प बसत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
जत नगरपालिकेच्या स्थापनेला अलिकडेच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.सहा महिन्यांपूर्वी जत नगरपालिकेची दुसरी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या अगोदर याच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात होते. नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर विविध विभाग वाढले. सभापतींची संख्या वाढली. अधिकार्यांची आणि कर्मचार्यांची संख्या वाढली. तरीही पालिकेचे कार्यालय जुन्याच इमारतीत भरत आहे. याचा फटका कर्मचार्यांना तर बसत आहेच. पण सगळ्यात त्रास हा कामानिमिताने येणार्या नागरिकांना येत आहे. तक्रार घेऊन आलेल्या लोकांना आपली तक्रार सांगायला ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांच्या स्वतंत्र केबीन नाहीत. बांधकाम,पाणीपुरवठा, कर वसुली, महिला बालकल्याण, आरोग्य यासह अस्थापना विभागाचे स्वतंत्ररित्या कामकाज असायला हवे. सभागृहासाठी जागा नाही. असे असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र जागेचा प्रश्नाविषयी काहीही बोलायला तयार नाहीत. नगरपालिकेचा कारभार खुराड्यात चालला असल्याचा आरोप होत आहे. नगरपालिकेने या मुद्द्याकडे लक्ष देऊन त्वरीत जागेचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment