जत,(प्रतिनिधी)-
जत नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील
मुख्य बाजारातील वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच गुहागर-विजापूर हा राष्ट्रीय मार्ग शहरातून गेल्याने या रस्त्यावरदेखील कमालीची वाहतूक
कोंडी होत आहे. जत पोलिस ही वाहतूक कोंडी फोडायची सोडून भलतेच
कोडे सोडवत बसत असल्याने जतच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जतचा नागरिक ही कोंडी फुटण्याची प्रतीक्षा करत आहे.
जतमध्ये सर्वच बाजूने वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य बाजारात तर ती जास्तच आहे. सध्या दिवाळीचा उत्सव
सुरू आहे. त्यानिमित्ताने तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी जतला
येत आहेत. यामुळे मुख्य बाजारात भलतीच वाहतूक कोंडी होत आहे.
या विषयावर वारंवार चर्चा होऊनही यावर उपाययोजना सापडत नसल्याने नागरिकांमधून
संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात जत नगरपालिका, महसूल विभाग आनि पोलिस प्रशासन यांच्या बैठका झाल्या आहेत,पण यावर उपाय सापडला नाही. नेहमीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी
पोलिसदेखील जागेवर नसतात. याचा त्रास मात्र लोकांना सहन करावा
लागत आहे. ही वाहतूक कोंडी कधी फुटणार, असाच सवाल उपस्थित होत आहे.
ऐन दिवाळीत खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना याचा नाहक त्रास होत आहे. नागरिकांना वाहतुकीच्या
कोंडीला सतत तोंड द्यावे लागत असून मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्या ग्राहकांच्यात घट होत आहे. याची जबाबदारी घेऊन जत
नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी
शहरातून होत आहे. दिवंगत विजयसिंहराजे ङफळे यांनी शहराची रेखीव
पद्धतीने रचना केली आहे. मात्र तालुका परिसरातील ग्राहक खरेदीसाठी
जत शहरात दाखल होत असतात. परंतु वाहतूक कोंडीमुळे येणारा ग्राहक
बाहेरील दुकानातून खरेदी करत आहे. वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना
न झाल्यास पुढील सणासुदीच्या दिवशी मुख्य चौकातील व्यापार्यांना
खरेदीसाठी ग्राहक उपलब्ध होणार नाहीत.
शहरात रस्ते मोठे असतानाही अनेक वाहनधारक दुचाकी
व चारचाकी गाड्या बेशिस्तपणे अस्ताव्यस्त लावतात. दुकानदारांनी
सर्व माल दहा फूट रस्त्यावर आणून ठेवल्यामुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
गांधी चौक, स्टेट बँक, महाराणा
प्रताप चौक, मेन रोड, बनाळी चौक;
तसेच स्टेट बँक या ठिकाणी दिवसभर व सायंकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुकीची
कोंडी असते. जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन मात्र या समस्येकडे
गांभीर्याने न पाहता रोजचीच बाब समजून दुर्लक्ष करत आहे. शहरात
मंगळवार व गुरुवार असे दोन आठवडे बाजार असतात. तेव्हा रस्त्यावर
कोंडी होते. बस स्थानक परिसर, महाराणा प्रताप
चौक, बिळूर चौक, संभाजी चौक परिसरात वडप
वाहने थांबलेली असतात. त्याची देखील यात भर पडत आहे. वाहतकू पोलिसांनी याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी
केली आहे.
No comments:
Post a Comment