Friday, November 2, 2018

चिमुकल्यांसाठी रेडिमेड किल्ले बाजारात उपलब्ध

जत,(प्रतिनिधी)-
सध्या दिवाळीनिमित्त चिमुकल्यांना किल्ले तयार करण्याचे वेध लागले आहेत. दरम्यान यासाठी रेडिमेड किल्ले बाजारात उपलब्ध झाले असून यंदा लाकडी किल्ल्यांचे सर्वांनाच आकर्षण निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण अगदी लहानपणापासून व्हावे, यासाठी राज्यात दिवाळी सणावेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा सुरू झाली. या किल्ल्यांमध्ये आसनावर आरूढ झालेले शिवाजी महाराज, किल्ल्यावर रक्षण करणारे त्यांचे मावळे, तोफा, झाडे-झुडुपे अशी आकर्षक मांडणी तसेच त्यांचे अष्टप्रधान मंडळ साकारून हिंदवी स्वराज्याची कल्पना लहान मुलांमध्ये रूजविण्याचे कार्य सुरू झाले. सध्या दिवाळीनिमित्त लाकडी किल्ल्यांची आवक वाढली आहे. दरम्यान सध्याच्या नवीन पिढीला ऐतिहासिक घटनांची माहिती मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, सिंह, हत्ती, घोडे, सिंहाशी कुस्ती खेळणारे संभाजी महाराज अशी विविध रूपे या किल्ल्यांमध्ये दाखविण्यात आली आहेत. याचा नव्या पिढीला निश्चितच लाभ होईल, असा आशावाद कोंतम चौकातील किल्ले विक्रेते सुनील काटकर यांनी व्यक्त केला.
इतिहासाची जपणूक व्हावी
लहान मुलांना किल्ले बनविण्याचा आपल्या संस्कृतीचा इतिहास जपण्यासाठी पालक, कुटुंबीयांनी मुलांना यासाठी उत्तेजन द्यायला हवे. लहान मुलांना किल्ले बनविण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावल्यास त्यांच्यातील कल्पकता निश्चितच वाढेल.

No comments:

Post a Comment