Thursday, November 1, 2018

आता एका मिनिटात मिळणार कर्ज


पंतप्रधान मोदी साधणार सांगलीशी थेट संवाद
जत,(प्रतिनिधी)-
लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी, या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लघुउद्योजकांसाठी सुलभ मार्ग या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आज (शुक्रवारी) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथून अनावरण करणार आहेत. देशातील निवडक जिल्ह्यात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्याची निवड झाली आहे.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी 4 वाजता होणार आहे. उद्योजकांच्या सुविधा देण्यासाठी क्लस्टर स्थापन केले जात आहे. यामध्ये अन्नप्रक्रियेसाठी सांगली जिल्ह्यात क्लस्टरची स्थापना होत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचा यामध्ये समावेश केला गेला आहे. या व्हिडीओ कॉन्फरसिंगसाठी वित्त विभागाचे सहसचिव उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्यासह अग्रणी बँक व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, उद्योजक उपस्थित राहणार आहेत.
उद्योजकांना बँकांकडून संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही सुविधा आहे. प्राथमिक टप्प्यात हा उपक्रम 100 दिवसांसाठी राबवला जाणार आहे. कोणताही उद्योजक ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी, तसेच अर्ज सादर करू शकतो. त्यानंतर नियमित वस्तू व सेवा करदाते व गत तीन वर्षांतील आयकर परतावा, सहा महिन्यांतील बँक खात्याचा ताळेबंद याबाबतची कागदपत्रे ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अर्जदार पात्र ठरल्यानंतर त्याला बँकांची नावे व दिल्या जाणार्या सेवा ऑनलाईन दिसतील. कर्जाचे व्याज; तसेच बँकेची उपलब्धता यावरून बँकेची निवड अर्जकर्त्याला करता येणार आहे. यामध्ये 59 मिनिटांत 10 लाख ते एक कोटी रुपये कर्ज मिळू शकेल. या सर्व प्रक्रियेमुळे कर्ज मिळण्याचा कालावधी कमी होणार आहे. इच्छुकांनी शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment