जत,(प्रतिनिधी)-
परीक्षा झाल्याशिवाय मोबाईलला हात लावायचा
नाही.टीव्ही पाहायचा नाही,लेपटॉप उघडायचा नाही ,अशी तंबी दिली
गेल्याने परीक्षा काळात त्याकडे ढुंकूनही न पाहिलेली मुले परीक्षा झाल्यावर मात्र
कुणाचे ऐकत नाहीत.परंतु मुले या कालावधीत काय पाहातात,काय
नाही याकडे लक्ष देण्याचे आवश्यकता आहे.आई-बाप आपल्या कामात व्यस्त
असल्यामुळे मुले काय करतात याकडे लक्ष देत नसल्याने घरातील नीतीमत्ता ढासळत
चालली असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रसारमाध्यमातून होणार्या नवनवीन धाडसी
प्रदर्शनांचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता पालकांनी दक्ष
राहणे जरुरीचे आहे. मुलांमध्ये सुधारणा करण्याआधी पालकांनी स्वत:मध्ये सुधारणा
घडविणे आवश्यक आहे; मात्र आजकाल पालकच मोबाईल आणि इंटनेटमध्ये डोके खुपसून
बसलेले पाहायला मिळतात.
‘टीव्ही चॅनेल्स’, ‘कॉम्प्युटर लॅपटॉप’
आणि ‘मोबाईल इंटरनेट’च्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होणारी ‘हवी ती’ आणि ‘नको ती’
माहिती याच्या गर्तेत सध्या किशोरवयीन पिढी अडकली आहे.
आई-वडिलांचा धाक, शिस्त आणि पालक म्हणून
नात्यात आदरच नसेल, तर नकळत्या वयात मुले भरकटतात. दूरदर्शन;
तसेच सिनेमा यातून दाखविल्या जाणार्या विकृतींनी समाजात स्थान
मिळविल्याचे निदर्शनास येते. यासाठी आज घराघरांतून मूल्यशिक्षण देण्याची गरज आहे.
पालकांनी बजावून सांगितलेले असते की, परीक्षा
झाल्याखेरीज ‘मोबाईल’ला हात लावायचा नाही. त्यामुळे कधी एकदा परीक्षा संपतात आणि
कधी एकदा ‘मोबाईल’वर ‘गेम’ खेळतो असे या विद्यार्थ्यांना होऊन जाते.
‘मोबाईल’ केवळ काही मिनिटे त्यांच्या हातात नसतो, तर
तासन् तास ही मुले पालकांचे ‘मोबाईल’ आपल्या ताब्यात घेऊन बसतात. यामुळे संपूर्ण
वेळ, दिवस त्यांचा त्यातच जातो. याचा परिणाम म्हणजे मुलांचे
लक्ष कुणाच्या बोलण्याकडे जात नाही. एकीकडे ‘मोबाईल’, एकीकडे
‘टीव्ही’वरील कार्यक्रम, ‘कार्टून्स’ किंवा ‘कॉम्प्युटर’वर
ही मुले तासन्तास खिळून बसलेली असतात. अशा मुलांना ना भूक लागते ना तहान.पालकांनी
मोबाईल,टीव्ही,लॅपटॉप या गोष्टींवरून
लक्ष विचलित करण्यासाठी नव्या गोष्टी शिकवाव्यात.ओरोगामी,चित्रकला,डान्स,तबला ,पेटी अशा गोष्टी
शिकवाव्यात.त्यासाठी क्लास लावावेत. म्हणजे मुले टीव्ही,मोबाईलवर
अडकून पडणार नाहीत.
No comments:
Post a Comment