Wednesday, April 10, 2019

सांगलीची पुन्हा राज्यभर चर्चा, हाताच्या चिन्हाशिवाय प्रथमच होतेय निवडणूक


जत,(प्रतिनिधी)-
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने आणि काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून राज्याच्या राजकारणात ओळख निर्माण करणारी सांगली या निवडणुकीत राज्यभर खूपच चर्चेत राहिली. सांगलीची जागाच काँग्रेसकडून काढून घेऊन खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला दिल्याने काँग्रेसच्याबाबतीत एक इतिहास रचला गेला आहे.  खासदार राजू शेट्टी यांचे दादा घराण्यावरील प्रेमाने अखेर त्यांना सांगलीची जागाही मिळाली आणि उमेदवाराच्या रुपाने दादांचा नातूही मिळाला. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक आजच्या घडीला रंगतदार बनली आहे.

सांगलीची जागा काँग्रेसला मिळणार नाही, याची कूणकूण लागल्याने माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांनी तर दादाप्रेमींचा मेळावा बोलावून पक्षाला सोडचिठ्ठी देत राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा खुद्द वसंतदादांच्या समाधीला साक्षी ठेवून केली. त्यानंतर राज्यातल्या सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चेत सांगलीचा उल्लेख येत राहिला. वसंतदादांचे दुसरे नातू विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्धार केला. खुद्द शेट्टींनीही, ‘सांगलीची जागा आम्हाला नको,’ असे अनेकवेळा सांगितले. परंतु सांगलीच्या काँग़ेस उमेदवारीवर आलेले बालंट काही केल्या दूर होऊ शकले नाही. अखेर जागेबरोबर उमेदवारही द्या, म्हणणारे शेट्टी यांना काँगे्रसच्या जागेबरोबर वसंतदादांचा नातू विशाल पाटील हे उमेदवारही मिळाले. हा सुवर्णमध्य संयुक्त पुरोगामी आघाडीतील सर्वच घटक पक्षांना पसंत पडला आणि भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचाच उमेदवार स्वाभिमानीचीबॅटघेऊन मैदानात उतरला. दोन पाटलांमध्ये अटीतटीचा सामना होणार, अशी चर्चा सुरू होते न होते, तोच भाजपचे नाराज धनगरनेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकावला. पडळकरांच्या उमेदवारीने या मैदानात केवळ तिसरा रंगच भरला नाही, तर जातनिहाय मतदारांच्या आकडेवारीची पडताळणी करण्यास भाग पाडले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सांगलीच्या मैदानात बारा उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये दोन राष्ट्रीय आणि चार राज्यपातळीवरची मान्यता असलेले पक्ष आहेत; तर इतर सहाजण अपक्ष उमेदवार आहेत. उमेदवारांची संख्या बाराच्या घरात असली तरी खरी लढत भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आणि खासदार संजय पाटील, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी पक्षासह संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यातच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पहिल्या टप्प्यात भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक विशाल पाटील यांच्या उमेदवारीनंतर मात्र चुरशीची झाली आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या आगमनाने जातीची आकडेवारी ठळक करणारी ठरत आहे, असे बोलले जात आहे. सांगलीची जागा काँग्रेसपासून हिरावून घेतली गेल्याने उमेदवारीही वसंतदादा घराण्यापासून चार हात दूरच राहील, असा सर्वांचा कयास होता. त्यामुळे संजय पाटील यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी मानली जाऊ लागली. परंतु एकतर्फीची चर्चा फार काळ टिकू शकली नाही. आपण स्वाभिमानी काँग्रेसचा पाईक असल्याचे सांगून वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीने विशाल पाटील यांनी स्वाभिमानीची बॅट हातात धरल्याचे जाहीर होताच संजयकाकांना टक्कर देणारा उमेदवार मैदानात उतरणार हे निश्चित झाले. चुकले असेल तर माफ करा, असे म्हणून थेट माफी मागून पुढे जाण्याची विशाल पाटील यांची तयारी असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळीच सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना, नाराजांना एकाच व्यासपीठावर आणले. त्यांनी जसे सर्वांना एका व्यासपीठावर आणले, तसेच पुढे प्रचारातही तीच एकजूट कायम ठेवत आघाडी घेतली आहे. काँग्रेस प्रथमच आपल्या पारंपरिक चिन्हा शिवाय निवडणुकीला सामोरे जात आहे. परंपरागत सांगली हा काँगे्रसचा बालेकिल्ला राहिल्याने हात हे चिन्ह काँगे्रस प्रेमींच्या परिचयाचे होऊन बसले होते. त्यांना आता ईव्हीएमवर बॅट चिन्ह शोधून बटन दाबावे लागणार आहे. एक मात्र निश्चित की, त्या ठिकाणी हात चिन्हच नसल्याने सवयीने हाताचे बटन दाबले जाईल, असे होणार नाही.
भाजपचे नाराज नेते गोपीचंद पडळकर यांचे टार्गेट भाजपचे उमेदवार संजय पाटील हे आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच पाटील यांना आव्हान द्यायला सुरुवात केली होती. काही दिवस स्वाभिमानीच्या उमेदवारीची पडळकरांनी वाट पाहिली. परंतु ती उमेदवारी विशाल पाटील यांच्याकडे गेल्यानंतर तासाभरातच प्रसारमाध्यमांना बोलावून पडळकरांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने जवळ घेऊन उमेदवारी दिली आहे. पडळकर हे धनगर समाजाचे नेते असल्याने त्या समाजाची मते त्यांच्याकडे वळतील, अशी चर्चा आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारीनंतर अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा प्रत्येक समाज आपले मत पडळकरांच्या पारड्यात टाकेल, असा दावा होऊ लागल्याने सांगली लोकसभा मतदार संघातील मतदारांची जातनिहाय आकडेमोड सुरू झाली आहे.
सांगली लोकसभा मतदार संघात एकूण 17 लाख 92 हजार मतदार आहेत. यामध्ये आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार मराठा, मुस्लिम, धनगर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, जैन आणि लिंगायत असा क्रम लावून चर्चा रंगू लागल्या आहेत. या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असून त्यापैकी तीन मतदार संघांत भाजपचे आणि एका मतदार मित्रपक्ष शिवसेनेचा आमदार असल्याने भाजप आघाडीच्या उमेदवाराला त्यांची ताकद मिळणार असल्याचे दिसत आहे. जत, खानापूर-आटपाडी आणि तासगावकवठेमहांकाळ या तीन विधानसभा मतदार संघात मराठा समाजानंतर मतदारांच्या संख्येत धनगर समाजाचा आणि तिसर्या स्थानावर अनुसूचित जाती-जमातीची मतदार संख्या आहे. 2014 च्या निवडणुकीत विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या पारड्यात धनगर समाजासह सर्वच समाजाच्या मतदारांनी भरभरून दान टाकले होते. त्यावेळी वसंतदादा घराण्याच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाने मोदीलाटेच्या आडून पक्षनिष्ठा, आघाडी धर्म बाजूला ठेवून काकांच्या विजयाला हातभार लावला होता. परंतु आता परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण आता मोदी लाटेचा प्रभाव दिसत नाही. 
सांगली -मिरज या दोन विधानसभा मतदार संघाचा बहुतांशी भाग महापालिका क्षेत्रात येत असून या ठिकाणी एकूण मतदानाच्या 40 टक्के मतदार राहतात. या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आणि महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला कसा आणि किती होतोय, यावर बरेच अवलंबून आहे. ग्रामीण भागाच्या पातळीवर विचार केला तर जिल्हा परिषदेच्या सत्तेसह सहापैकी पाच पंचायत समित्या भाजपकडे आहेत. आपल्यातूनच जाऊन भाजपचा मळा फुलवणारे भाजपच्या उमेदवारावर नाराज असतील तर त्या नाराजीचा फायदा उठविण्यात काँगे्रस-राष्ट्रवादीतले तरबेज नेते यशस्वी होतील का, याची उत्सुकता लागली आहे.दोन्ही काँग्रेसने मनावर आणले तर निकाल पलटवू शकतात.पण काँग्रेसचा पराभव काँग्रेसचे करू शकते, याचाही विचार इथे केल्याशिवाय राहत नाही.

No comments:

Post a Comment