Wednesday, April 24, 2019

जतेत घरफोडी पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील विठ्ठलनगर येथील नितीन तुकाराम साळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सुमारे पाच तोळे सोने व रोख साठ हजार रक्कम असा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमाल लंपास केला. ही चोरी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झाली.

जत शहरातील येळवी मंगळवेढा रस्त्यावर विठ्ठलनगर हे उपनगर आहे. येथे राहणारे नितीन तुकाराम साळे यांचे कुटुंबीय मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुक्यातील मुचंडी येथील दऱयाप्पा देवाच्या यात्रेसाठी गेले होते. सायंकाळी जाताना त्यांनी घराला कुलूप लावून गेटही बंद केले होते. दरम्यान रात्री साडे सात ते आठच्या सुमारास कांही चोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घराचे कुलूप कटावणीने तोडले.
त्यानंतर आत घरातील तिजोरीही कटावणीने तोडून तिजोरीतील पंधरा तोळे सोने व रोख साठ हजार असा एकूण सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला. सोन्यामध्ये गंठन, नेकलेस, बांगडय़ा, अंगठी, चेन असा ऐवज आहे. दरम्यान, रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते दऱयाप्पा देवाचे दर्शन घेवून आल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर जत पोलीसांना कळवण्यात आले. विशेष म्हणजे रात्री आठच्या सुमारास आजूबाजूचे लोक जागे असताना सुध्दा ही चोरी केली आहे. माहीतगार माणसांनीच ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास एपीआय अनिल माने करीत आहेत.

No comments:

Post a Comment