Tuesday, April 9, 2019

केवळ घरपोच सेवेमुळे जारच्या शुध्दतेचे निकष रामभरोसे


उन्हाळ्यात जारचे पाणी महागले
जत,(प्रतिनिधी)-
चैत्र महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच उन्हाचा कडाका वाढत असतानाच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने अनेकांचे बोअर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची मागणीही वाढल्याने जारचे पाणी विके्रेत्यांची चांदी सुरू झाली आहे. जारचे पाणीही आता तब्बल दहा रुपयांनी महागले आहे. जारच्या पाण्याची कोणतीही शुध्दता न तपासताच केवळ घरपोच सुविधा असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना जारचे पाणी घ्यावेच लागत आहे.

     मागील काही वर्षांपासून जतला विकतच्या पाण्याचा व्यवहार वाढला आहे. सातत्याने आजार, पिण्याच्या पाण्याला यणारी दुर्गंधी आणि भीषण टंचाई यामुळे जतकरांना जारच्या पाण्याची सवय लागली आहे. या पाण्याची मागणी वाढत असल्याने पाणी शुध्दीकरण यंत्र खरेदी करून त्याच्या माध्यमातून जारचे पाणी विक्रीचा व्यवसाय बनला आहे. अनेकांना थेट घरापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था जार विक्रेत्यांकडून सुरू आहे. जारच्या पाण्याची अनेकांना सवय लागल्याने अनेक घरांसह प्रत्येक शासकीय व खासगी कार्यालयांमध्येे जारचे पाणीच दिसत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक समारंभातही आता जारच्या शुध्द पाण्याची पिण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. कार्यक्रम, लग्न समारंभ यामध्ये जारचे पाणी ही एक सवय बनली आहे. वाढत्या मागणीमुळे प्रत्येक गल्लीबोळातही शुध्द पाणी निर्माण करणारे व्यवसाय सुरू आहेत. स्वतःचा एक बोअर व मशीन खरेदीसाठी आवश्यक असणारे थोडे भांडवल असले की कोणीही शुध्द पाणी तयार करण्याचे प्लँट टाकत आहेत.
मागील आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. अनेकांचे बोअर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांचे बंद पडले आहेत. जत शहराला आठवड्यातील फक्त दोन वेळाच पाण्याचा पुरवठा होतो. नागरिकांना चार-पाच दिवस पाणी साठवून ठेवावे लागत आहे. त्यातच डासांचे प्रमाण वाढत आहे. नागरिक आजारी पडत आहेत. पण जतची नगरपालिका आजाराचे मूळ शोधायला तयार नाही. शेवटी नागरिकच पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजत आहेत. शहराला खरे तर दोन दिवसाआड तरी निदान पाणी पुरवठा व्हायला हवा आहे. म्हैसाळचे पाणी बिरनाळ तलावात भरून घेण्याची आवश्यकता आहे. पण याकडे कोणाचेच लक्ष नाही.
त्यामुळे अशा टंचाई स्थितीत नागरिकांना विकत का होईना परंतु, पाणी देण्यासाठी अनेकांनी पाणी शुध्दीकरण यंत्र बसविले आहेत. त्याच प्रमाणे वापरण्याच्या पाण्यासाठी टँकरही दुरुस्त होताना दिसत आहेत. टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना आपली गरज भागवावी लागते, हा अनुभव पाठीशी आहे. त्याचप्रमाणे जारचेच पाणी प्रत्येक घर, कार्यालयात पिण्यासाठी वापरण्यात येते, हे माहीत असल्याने शुध्द पाणीपुरवठ्याच्या मशीन्स गल्लीबोळात बसताना दिसत आहेत. हे पाणी खरोखरच किती शुध्द आहे, याची पडताळणी करणारी कोणतीही यंत्रणा प्रशासनाकडे नाही, अथवा तसे झालेले आढळून येत नाही. तरीही उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात झाल्यापासून जतमधील पाणी विके्रत्यांनी आपल्या जारच्या किमती वाढविल्या आहेत. जे जार आजपर्यंत 15 ते 20 रुपयांना मिळत होते, ते आता 30 रुपयांना झाले आहेत. तर जे जार 25 ते 30 रुपयांपर्यंत मिळत होते ते आता 25 ते 40 रुपयांना झाले आहेत. जारच्या किमंती वाढल्या तरी जतकरांना चार दिवसांतून येणार्या पाण्यामुळे जारचे पाणी घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. किमती वाढल्या तरी जारची मागणीही वाढतच आहे. याच्या किंमतीवर प्रशासनानेच लक्ष घालून शुध्द पाण्याच्या नावाखाली सुरू असलेली लूट बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.



No comments:

Post a Comment