Thursday, April 18, 2019

वातावरण गरम आणि राजकारण नरम

जत तालुक्यातील स्थिती
जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता केवळ चार दिवस  शिल्लक राहिले आहेत. भाजप, स्वाभिमानी शेतकरी व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, काही नेते पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदार संघात फिरत असले तरी निवडणूक वातावरण नरमच आहे. उन्हाचा तडाखा वाढला असला तरी राजकारण मात्र थंड आहे. गावोगावी शांतता आहे.

   उन्हाचा तडाखा असूनही जत विधानसभा मतदार संघात प्रचार सुरू आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संख येथे येऊन गेले तरी राजकारण तापले नाही. एकीकडे वातावरण गरम आहे आणि दुसरीकडे राजकीय वातावरण नरम  आहे.
निवडणूक येणार म्हणता म्हणता आता मतदानाची वेळ जवळ येऊ लागली आहे. प्रशासनानेही चांगलीच तयारी केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत ज्याठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी झाली होती, तेथेही ती वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
भाजपचे खासदार संजय पाटील यांना गेल्यावेळच्या निवडणुकीत जत विधानसभा मतदार संघात 44 हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. यंदा भाजपचे संजय पाटील यांच्याविरूद्ध महाआघाडी- स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत होत आहे. या तिघांमध्ये जतमध्ये जोरदार लढत सुरू आहे. तिघेही जत मतदार संघात  फिरत आहेत.
    या तिघांनीही  जाहीर झाल्यापासून शहरापेक्षा ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागात रणधुमाळी सुरू आहे. पण शहरात मात्र अजूनही रंगत आलेली नाही. शेवटच्या टप्प्यात उमेदवार शहरात लक्ष देतील, असे चित्र आहे.
तीनही उमेदवारांच्या सभा सुरू आहेत. विकासकामांचा मुद्दा या निवडणुकीत दिसू लागला आहे. संजय पाटील यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. गोपीचंद पडळकर यांनी गेल्यावेळी विधानसभा निवडणूक लढविली होती. विशाल पाटील यांना मात्र विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही. तरीही त्यांनी रान उठविले आहे. वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असादउद्दीन ओवेसी सभा घेणार का? याकडे लोकांचे लक्ष  आहे.
ही निवडणूक जरी लोकसभेची  असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीची गणितेही प्रचारात केली जात आहेत.त्यादृष्टीने राजकारण सुरू आहे. भाजपचे आमदार विलासराव जगताप व काँग्रेसचे विक्रम सावंत अन्य पक्षातील इच्छुक कामाला लागले आहेत.  मात्र यात स्वामी अमृतानंद, डॉ.रवींद्र आरळी, तम्मनगौडा रवीपाटील यांची हालचाल मंदावल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment