जत,(प्रतिनिधी)-
गुडी पाडव्याच्या मुहुर्तावर जत येथील
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा क्र.1 मध्ये
पहिली इयत्तेत मुलांचे नाव दाखल करण्यासाठी पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
या दिवशी तब्बल 30 मुलांनी पहिलीत प्रवेश घेतला.या मुलांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी
गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने, शिक्षणविस्तार अधिकारी आर.डी. शिंदे
प्रामुख्याने उपस्थित होते.
जत येथील शाळा क्रमांक 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेने विविध उपक्रम राबवत आणि
दर्जेदार शिक्षण देत शहरासह तालुक्यात आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जाणारा मुलांचा लोंढा थांबला आहे.
साहजिकच जून 2019 मध्ये मुलांना शाळेत दाखल करण्याची
मुदत असताना पालक आपल्या मुलांना आतापासूनच दाखल करून घेण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून
येत आहे. ही शाळा आयएसओ नामांकनासाठी नामनिर्देशित झाली आहे.
विविध शालेय, सहशालेय उपक्रमांची यशस्वी आखणी व
त्यांची अंमलबजावणी यासाठी ही शाळा आणि येथील शिक्षक प्रयत्न करताना दिसतात.
इंग्रजी माध्यमाच्या आणि खासगी शाळांमधील विद्यार्थी दोन तीन वर्षात
या शाळेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. 
या शाळेत इयत्ता पहिलीपासून संगणकाचे
धडे दिले जात आहेत. सेमी इंग्रजी शिक्षणाची
व्यवस्था असून त्याची खास तयारी करून घेतली जाते. वैयक्तिक मार्गदर्शनाबरोबरच
इयत्ता चौथी शिष्यवृत्तीच्या तयारीकडेही लक्ष दिले जाते. स्पर्धा
परीक्षा,चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या
माध्यमातून मुलांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो. 
नवागतांच्या स्वागताप्रसंगी शाळा व्यवस्थापन
समिती अध्यक्ष पार्वती भोसले, मुख्याध्यापक संभाजी
कोडग, वर्षादेवी जगताप, विशाखा सावंत,
कविता आंबी, आशा हावळे यांच्यासह शाळा व्यवस्थापन
समितीचे सदस्य,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment