पाणी,चारा, रोजगाराचा प्रश्न गंभीर;
सवलती कधी मिळणार?
जत,(प्रतिनिधी)-
सध्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला
आहे. उमेदवारी दाखल करून काहींनी प्रचाराचा नारळदेखील फोडला
आहे. राजकारणी लोक यात अडकून पडले आहेत. प्रशासन मतदान अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण,बूथ पाहणी, अन्य तयारी यात गुंतले आहेत.मात्र दुसर्या बाजूला दुष्काळग्रस्त लोक पिण्याच्या
पाण्यासाठी धावाधाव करताहेत. हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही अशा कठीण परिस्थितीत दिवस काढत आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या टँकरवाल्यांचे
फावले असून त्यांचे नखरेही लोकांना झेलावे लागत आहेत.
सांगली लोकसभा मतदार संघासाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी चालवली जात आहे. मतदान
अधिकारी आणि कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसरे प्रशिक्षण 12 तारखेच्या दरम्यान नेमणूक कोठे
होईल, त्या मतदारसंघात होणार आहे. सांगली
जिल्ह्यातल्या कर्मचार्यांना दुसर्या
मतदारसंघात नेमणूक दिली जाणार आहे. याशिवाय बूथ पाहणी,
तेथील व्यवस्था, मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम
वेगाने सुरू आहे. यात महसूल विभाग पुरता अडकला आहे. त्यांना साथ म्हणून पंचायत समिती, राज्य बांधकाम विभागातील
कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांची कामे ठप्प झाली आहेत.
प्रशासन एकिकडे आपल्या कामाला लागले
असताना दुसरीकडे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते,कार्यकर्ते
आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. भाजपाच्या
उमेदवाराने जत तालुक्यात प्रचाराची धडक मोहिम राबवली आहे. आघाडीत
सामिल असलेल्या स्वाभिमानी पक्षाला काँग्रेसने सांगलीची जागा सोडली आहे. मात्र त्यांना उमेदवार आयातच करावा लागला. माजी मुख्यमंत्री
वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना ही उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते
उपस्थित होते. चौरंगी वाटणारी लढत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या
माघार घेण्याने तिरंगी होत आहे. वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर
उभे आहेत. आता जवळपास सर्व चित्र स्पष्टपणे दिसत असून सर्वच पक्षातील
नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीला रंग
चढत असताना जतसह जिल्ह्यातील दुष्काळी जनतेचे मात्र हाल सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून लोकांना यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात 70 गावे आणि साडेचारशे वाड्यावस्त्यांना पिण्याच्या
पाण्याचा टँकरने पुरवठा केला जात आहे. पण हे टँकरवाले मधेच गायब
होताना दिसत आहेत. प्रशासनाचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही.
जत तालुक्यात 120 गावे आहेत. या सर्वच गावांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. जिल्ह्यातील
पाच तालुक्यांना दुष्काळाची झळ बसत आहे. शेती कर्जाच्या वसुलीला
स्थगिती देऊन विविध प्रकारच्या सक्ती करण्यात आल्या आहेत. मात्र
त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होताना दिसत नाही. निवडणुकीच्या
कामामुळे दुष्काळी उपाययोजनांबाबत हेळसांड सुरू असल्याचा आरोप होत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पाण्यासाठी वाद सुरू आहेत. चारा नसल्याने जनावरे सोडून देण्याची किंवा कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरत
आहे.
पाणी टंचाईमुळे बागायती क्षेत्रात मोठी
घट झाली आहे. नव्या कामांना ब्रेक देण्यात आल्याने
रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड्यातले
लोक विशेषत: तरुण रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहेत.
रोजगाराच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment