Wednesday, April 10, 2019

पारावरच्या गप्पांना चढू लागला रंग


जत,(प्रतिनिधी)-
मोबाईलच्या आणि हायटेक प्रचाराच्या जमान्यात अजूनही खेडोपाडी पारावरच्या गप्पा महत्त्वाच्याच मानल्या जातात. आज गावागावातले पारावरचे कट्टे पुन्हा गर्दीने फुलू लागले आहेत. साहजिकच सांगली लोकसभेचे धूमशान दिवसेंदिवस अधिकच जोर धरू लागल्याने पारावरच्या गप्पांना ऊत आला आहे. राजकारणाचे आडाखे बांधण्याच्या चर्चेने रंगू लागल्या आहेत. सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीवर सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजप महायुती, काँग्रेस महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतही चुरस असून कोण किती लीड घेणार? कुणाला किती मतं पडणार? कोण कुणाची गेम करणार? असे एक ना अनेक प्रश्नाचं गुर्हाळ सध्या पारावरच्या गप्पामध्ये रंगू लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्या या गडाला सध्या मोठंच्या मोठ्ठं भगदाड पाडण्यात भाजपला चांगलेच यश आलं आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांत भाजपने बाजी मारलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकारणाचे वारे जोरात वाहू लागले असून प्रचाराचा धुरळा उडू लागलेला आहे. प्रचार फेर्या, बैठका, कॉर्नर सभांवर प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे शिलेदार जोर देऊ लागलेले आहेत.
जिल्ह्यात भाजपचे आघाडीचे नेतेही प्रचारात उतरले असून ही प्रतिष्ठेची लढाई जिंकण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून व्यूहरचना आखली जात आहे. काँग्रेसने पक्षातील मरगळ बाजूला झटकून प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची भूमिकाही स्वाभिमानीच्या उमेदवाराला कितपत फायदेशीर ठरेल, याचंही गणित आता पारावरच्या गप्पांमध्ये मांडले जाऊ लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे सांगलीची लढत अटीतटीची बनली असून या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राचेही लक्ष लागून राहिले आहे. या लढतीत कोण बाजी मारतोय? याचीही जोरदार चर्चा पारावरच्या गप्पांमध्ये सुरू आहे. नेतेगिरी करणारे मात्र कानोसा घेण्याच्या नादी लागलेले आहेत.

No comments:

Post a Comment