Tuesday, April 30, 2019

लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये बालगाव येथील सूर्यनमस्कार योगसाधनेची नुकतीच नोंद

सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बालगाव येथे गतवर्षी दि. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ऐतिहासिक योग शिबिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सूर्यनमस्कार योगसाधनेबाबत लिम्का बुककडून जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

गतवर्षी तत्कालिन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन व गुरूदेवाश्रम बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऐतिहासिक योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे 1 लाख 10 हजार योगप्रेमींनी सहभाग घेऊन सूर्यनमस्कार योगसाधना केली. या ऐतिहासिक क्षणाची नोंद जागतिक मान्यताप्राप्त एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आदि ठिकाणी यापूर्वीच झाली आहे. सर्वाधिक लोकांनी एकत्र येवून सूर्यनमस्कार योग साधना करण्याचा हा ऐतिहासिक क्षण असल्याच्या शब्दात वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी मोहोर उमटवली.
याबाबत तत्कालिन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी गुरूदेवाश्रम, बालगावचे अमृतानंद स्वामी आणि त्यांचे सहकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांची टीम, पोलीस अधीक्षक व त्यांची टीम, जिल्हा माहिती कार्यालय व पत्रकारबंधू, तसेच, सहभागी नागरिक, विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे हा विक्रम झाल्याची भावना व्यक्त करून त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

No comments:

Post a Comment