केंद्रशाळा खटाव येथे आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप
मिरज,(प्रतिनिधी)-
आपले आदर्श आणि छंद आपली ओळख बनवितात , असे प्रतिपादन लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी खटाव (ता. मिरज) येथे व्यक्त केले. ते जिल्हा परिषद केंद्रशाळा खटाव येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता बोलत होते. यावेळी प्रश्नोत्तर संवादातून मुलांना मोकळीक देण्यात आली होती.
इयत्ता आठवीच्या पुस्तकात असणारा राधिका मेनन या पाठाचे लेखक आठवीच्या विद्यार्थ्यांना भेटायला आणि हितगुज करायला आलेत हे पाहून विद्यार्थ्यांत उत्सुकता होती. अतिथी म्हणून उपस्थित पत्रकार शिक्षक प्रवीण जगताप म्हणाले, आपल्या आजूबाजूला बरेच घटक शिकण्यासारखे असतात. खस्ता खाल्ल्याशिवाय शरीर अन मनाला आकार येत नाही.
निरोपाच्या सुरूवातीला उपक्रमशील शिक्षक सुनील लांडगे यांनी रेखाटून रंगकाम केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राचे श्री. ऐनापुरे यांच्या हस्ते फित कापून अनावरण करण्यात आले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस भेटवस्तू दिली. यावेळी मुख्याध्यापक अशोक बनसोडे, राजकुमार पवार, मिलन नागणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बजरंग होनमोरे, सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते. कुमार परीट, विजय बनसोडे, आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक सहदेव बागी यांनी तर आभार बसवराज तेली यांनी मानले. संयोजन सर्व शिक्षकांनी केले.
फोटो ओळ : खटाव येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचे स्वागत करताना शिक्षक.
No comments:
Post a Comment