Saturday, April 13, 2019

जत पूर्वभागात प्रचाराची रणधुमाळी सुरू


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्याच्या पूर्वभागात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नेते एकीकडे व कार्यकर्ते दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली असून काही कार्यकर्ते नेत्यांच्या इशार्याकडे नजरा लावून बसले आहेत. जत तालुक्याच्या पूर्वभागात माडग्याळ, संख, दरीबडची, उमदी, जाडरबोबलाद, तिकोंडी, मुचंडी ही मोठी गावे असल्याने उमेदवारांच्या नजरा जत पूर्व भागाकडे लागल्या आहेत.

जत पूर्व भागात जाडरबोबलाद, उमदी, मुचंडी ही जिल्हा परिषद मतदार संघ येतात. जत पूर्वभागात भाजपकडे सभापती तम्मनगौडा पाटील, सरदार पाटील, संखचे आर. के. पाटील, जिल्हा परिषद सदस्य रेखा बागेळी, माडग्याळचे विठ्ठल निकम, सोमाण्णा हाक्के, राजू लकडे, संजू तेली, उटगीचे बसवराज बिराजदार, शिवसेनेचे अंकुश हुवाळे, जनसुराज्यशक्ती पक्षाचे बसवराज पाटील आदींनी खासदार संजय पाटील यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. स्वाभिमानी व मित्रपक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांची धुरा पूर्व भागात चनाप्पा होर्तिकर, विक्रम सावंत, व्हनाप्पा माळी, जिल्हा परिषद सदस्य कलावती गौरगुंड, उमदीचे निवृत्ती शिंदे, महादेव अंकलगी यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचेउमेदवार गोपीचंद पडळकर यांची धुरा माजी आमदार प्रकाश शेंडगे, अशोक बन्नेनवर, कामाण्णा बंडगर, दादा तांबे यांच्यासह अनेक नेते पडद्यामागून प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भाजप, स्वाभिमानी व वंचित आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असली तरी भाजप व स्वाभिमानी आघाडीतील नेते एकीकडे व कार्यकर्ते वंचित आघाडीकडे अशी परिस्थिती झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. वंचित आघाडीकडे जत पूर्वभागातील काही पक्षाचे पदाधिकारी काम करत आहेत. काही ठिकाणी कार्यकर्ते वंचित आघाडीत, तर नेते पक्षाच्या स्टेजवर अशी स्थिती आहे. लिंगायत, मुसलमान, मागासवर्गीय व इतर समाजाचे मतदान हे कुठल्या पक्षाकडे झुकते त्यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment