Tuesday, April 9, 2019

सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात: प्रांताधिकारी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळाशी सामना करण्यास प्रशासन सज्ज आहे. तालुक्यात चारा छावणी चालू करण्यास प्रशासन सज्ज असून सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन छावणी चालू करण्यास पुढे येण्याचे आवाहन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.
गोंधळेवाडी येथील चिक्कलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी चालू केलेल्या चारा छावणीला प्रांताधिकारी ठोंबरे यांनी भेट दिली.
त्यांनी जत तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधत दुष्काळाबाबतची सर्व वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेतली. प्रांताधिकारी ठोंबरे म्हणाले, जत पश्चिम भागातम्हैसाळच्या पाण्यामुळे दुष्काळाची दाहकता जाणवत नाही. मात्र जत पूर्वभागात दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. प्रशासनाने मागेल त्या गावाला टँकर चालू केले आहेत. ग्रामपंचायतीने पाणी वाटपाचे नियोजन चांगले केले पाहिजे. गळका टँकर असेल, खेपा होत नसतील तर प्रशासनाला त्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. खेपांचे नियोजन ग्रामपंचायतीने करावे. तालुक्यात छावण्या चालू करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. मात्र या शेगाव वगळता कोठूनही प्रस्ताव येत नाहीत.
सामाजिक संस्थांनी चाराछावणी चालू करण्यासाठी पुढाकार घ्यावा व कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात येतील. यावर्षीचा दुष्काळ हा शेवटचा ठरावा, यासाठीम्हैसाळचे पाणी जत पूर्वभागातील प्रत्येक गावाला मिळावा, यासाठी आचारसंहिता शिथील झाल्यानंतर अधिकारी स्तरावर बैठक घेऊन लोकसहभागातून काम करता येईल का, तसे वरिष्ठांना कळवू, असे प्रांताधिकारी म्हणाले. पाण्याविषयी मतदानावर बहिष्कार टाकणे हा पर्याय नसून मतदान हे पवित्र दान आहे. ते बजावलेच पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेचम्हैसाळचे पाणी हे दुष्काळ भागासाठी मिळावे, यासाठी लोकसहभागातून काम करणार असल्याचे चिक्कलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी सांगितले.
दरवर्षी दुष्काळ पडत असतो. मात्र त्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून पाणी आपण जमिनीमध्ये मुरवू शकतो. सांडपाणी हे रस्त्यावर सोडण्यापेक्षा शोषखड्डे काढून सोडावे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यास मदत होते. दुष्काळाची दाहकता व जनावरांचे हाल पाहून मोफत चारा छावणी करून तुकाराम महाराजांनी नवा आदर्श ठेवला आहे, असे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले.





No comments:

Post a Comment