जत,(प्रतिनिधी)-
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तसेच
पाण्याच्या पातळीत झालेली कमालीची घट याचा फटका कमी पाण्यावर जगणार्या
शिंदीच्या झाडांवरही झाला असून त्यामुळे नैसर्गिक शिंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली
आहेत. रासायनिक पावडर आणि पाणी याची कृत्रीम शिंदी बनवून लोकांची फसवणूक
केली जात आहे.
कमी पावसाच्या जतच्या भागात ओढ्याकाठी, शेतीच्या
बांधावर, कमी पावसाच्या भागात आढळणारी शिंदीची झाडे आता कमी
झाली आहेत. ओढ्याकाठी असलेली शिंदीची वने दुर्मिळ होऊ लागली आहेत. त्यामुळे
नैसर्गिक शिंदी उत्पादनात मोठी घट झाली आहे.मात्र रासायनिक पावडर टाकून कृत्रीम
शिंदी बनवून जत तालुक्यात त्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. त्यामुळे
त्याचा शरीराला अपाय होऊन मेंदू,श्वसन यावर होत आहे.हात
थरथरणे,घसा कोरडा पडणे,चक्कर येणे,
असे प्रकारही होत आहेत.तालुक्यात दिनदहाडे बोगस शिंदी विकली जात
असतानाही पोलीस किंवा दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग गप्प आहे.त्यामुळे त्यांच्या
या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
जत तालुक्यात कुंभारी, कुडनूर ,खोजनवाडी,बिलूर,मेन्ढेगिरी,मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ
खुर्द, रावळगुंडवाडी, कागनरी, जालिहाळ बुद्रुक, तिकोंडी, करजगी,
बोर्गी या गावांमध्ये बोर नदीकाठी, ओढ्याकाठी,
शेतीच्या बांधावर या झाडांची संख्या अधिक आहे. ही गावे शिंदीसाठी
प्रसिध्द आहेत. शिंदी बनविण्याचा व्यवसाय कर्नाटक व आंध्र प्रदेशमधून आलेले येळगार
लोक करतात. पावसाचे प्रमाण गेल्या १० वर्षांपासून कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी
झाली आहे. सध्या ही पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत गेली आहे. परिणामी ही झाडे वाळू
लागली आहेत.
शासनाने शिंदीचा समावेश फळझाडांमध्ये केला आहे. या
झाडांची वाढ जलद होते. कमी खर्चात लागवड करता येते. पडिक व नापीक जमिनीच्या ठिकाणी
लागवड केल्यास उत्पादन व रोजगार मिळू शकतो. जत पश्चिम भागात ‘म्हैसाळ’चे पाणी आले
आहे. ओढ्याकाठी झाडांची लागवड, संवर्धन करणे शक्य आहे. पूर्व भागात
वन विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment