Monday, April 8, 2019

चारा-पाण्याअभावी मेंढ्यांची होतेय उपासमार


जत तालुक्यातील परिस्थिती:मेंढपाळ दुष्काळाने पिचला
जत,(प्रतिनिधी)-
जतसह दुष्काळी आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. अनेकांचे पोट याच व्यवसायावर आहे. उपजीविकेचे साधन म्हणून पाहात असलेल्या या मेंढपाळांच्या आयुष्यात मात्र सतत भटकणं हेच लिहून ठेवलं आहे. अलिकडच्या काही वर्षात पाऊसमान कमी होत चालल्याने वाडवडिलार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे.यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे.

मेंढीपालन हा व्यवसाय जत तालुक्यातला वडिलोपार्जित व्यवसाय आहे. जत तालुक्यात मोकळे रान अधिक असल्याने मेंढपाळांना पावसाळ्यात चार्याची अजिबात कमतरता पडत नसे. इतर वेळीही चारा उपलब्ध होत असे,मात्र अलिकडच्या काही वर्षात पाऊसमान कमी होत चालल्याने चार्याचा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षात म्हणावा असा पाऊस झाला नाही,त्यामुळे रब्बी आणि खरीप हंगामात शेतकर्यांच्या हाताला काहीच लागले नाही. जनावरांच्या चार्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालणारा हा व्यवसाय हळूहळू कमी होत आहे. मेंढ्यांच्या केसांपासून घोंगड्या करण्याचा व्यवसाय तर व्हसपेट गाव सोडले तर हद्दपारच झाला आहे. चारा-पाणी यांचा बिकट प्रश्न होत चालल्याने मेंढपाळांचे जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे.
जत तालुक्यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे 3 लाख 66 हजार 366 शेळ्या मेंढ्या आहेत. यात सर्वाधिक संख्या जत तालुक्यात आहे. 1 लाख 53 हजार 887 इतकी शेळ्या-मेंढ्यांची संख्या जत तालुक्यात आहे. कवठेमहांकाळमध्ये 54 हजार 401, खानापूर 27 हजार 410, तासगाव 39 हजार 739, आटपाडी तालुक्यात 90 हजार 929 शेळ्या-मेंढ्यांची संख्या आहे.
गेल्या जूनपासून मोकळ्या रानात चारा उपलब्ध नाही. डोंगरमाथ्यावरील खुरटं गवत सुकून गेलं आहे. पाणी नसल्याने झाडेझुडपे सुकून गेली आहेत.झुडुपांची पानेसुद्धा वाळून गेली आहेत. झाडाझुडपांवर फक्त वाळलेल्या काटक्याच शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे दिवसभर मेंढरं कुठं फिरवून आणायची, असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. चारा विकत घेऊन जनावरांना घालायचा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. सध्या मेंढ्या विकून प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मेंढ्यांच्या कळपातल्या मेंढ्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यातच गावात,परिसरात काम नाही. त्यामुळे मेंढ्या विकून आणखी किती दिवस काढायचे, असा मोठा प्रश्न मेंढपाळांना पडला आहे. लोकसभेच्या आचारसंहितेचा बाऊ करून जनावरांच्या छावण्यांना कोलदांडा घातल्याने शेतकर्यांना फक्त आभाळाकडे बघण्याशिवाय पर्याय राहिला नाही.



No comments:

Post a Comment