Thursday, April 4, 2019

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसाठी न्यायालयात जाणार


औरंगाबाद खंडपीठाचा आगाऊ वेतन देण्याबाबत निकाल
जत,(प्रतिनिध)-
 आगाऊ वेतनवाढीबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने संबंधित शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या धर्तीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना अतिउत्कृष्ट कामासाठी दिल्या जाणार्या आगाऊ वेतनवाढीसाठी न्यायालयात जाणार असल्याचे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी सांगितले.

 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सलग तीन, पाच वर्षे अतिउत्कृष्ट कामासाठी एक, दोन आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती. परंतु सहाव्या वेतन आयोगाच्या (हाकिम समिती) शिफारशीनुसार सर्व आगाऊ वेतनवाढी सन 2009 पासून स्थगित करून शासनाने 24 ऑगस्ट 2017 रोजीच्या परिपत्रकाने सर्व आगाऊ वेतनवाढी बंद करण्याचा निर्णय घेतला. या परिपत्रकाच्या बाबतीत शिक्षकांनी नाराजी व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरगांबाद खंडपीठात राजेंद्र विठ्ठल ढाके आणि इतर काही शिक्षकांनी अॅड. संदीप सोनटक्के यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी होऊन अंतिम सुनावणीवेळी याचिकाकर्त्या शिक्षकांच्यावतीने अॅड. संदीप बी. सोनटक्के यांनी युक्तिवाद करत, संबंधित शासननिर्णय हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारा नसून तो जुलमी उद्देशीय आहे, असा युक्तिवाद केला. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आगाऊ वेतनवाढीसाठी सांगली जिल्ह्यातील 47 शिक्षकांनी ही याबाबतीत औरगांबाद येथील न्यायालयात अॅड. संदीप सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली याचिकेचाही निर्णय लवकरच लागेल. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनीही अतिउत्कृष्ट कामाच्या आगाऊवेतनवाढीसाठी न्यायालयात जाणार असून शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, दयानंद मोरे, सतीश पाटील, माणिक पाटील महिला आघाडीच्या प्रमुख सुनीता चौगुले-पाटील, विजया माने, नसिमा मुजावर, शारदा सलगर यांनी केले आहे. यावेळी किरणराव गायकवाड, किसनराव पाटील, शशिकांत भागवत, सयाजीराव पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment