Saturday, April 13, 2019

‘रसद’ न आल्याने कार्यकर्ते ढेपाळले


 जत,(प्रतिनिधी)-
सांगली लोकसभा निवडणूक आता जातीच्या समीकरणावर आली आहे. भाजप असो की काँग्रेस आघाडी; नेते मनापासून प्रचार करतायेत का, हा खरा प्रश्न आहे. धनगर समाजातील काही गट गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी मैदानात उतरला आहे. तर मराठा समाजाच्या मतांची विभागणी होऊन तिसर्या उमेदवाराला फायदा होऊ नये,यासाठी एक गट कार्यरत झाला आहे. असे असले तरी कार्यकर्ते मात्र प्रचारात उतरून ढेपाळले आहेत. रसद आली नसल्याने मतदारांपर्यंत कसं पोहचायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तरी वरवरच प्रचारयंत्रणा राबवली जात आहे.

उन्हाने घायाळ झालेले उमेदवार, कार्यकर्ते सकाळीच पदयात्रा आवरून घेत आहेत. अन्य विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे नेते थेट उमेदवाराला सांगत आहेत की, रसद तुम्हीच पुरवा, आम्हाला विधानसभा निवडणुका पुढे आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, नेतेमंडळी उमेदवार, पक्षाकडून येणार्या रसदीची वाट पाहत आहे. भाजपचे संजयकाकांनी सर्व तालुक्यात पदयात्रा, सभा घेऊन जिल्ह्याची पहिली प्रचारफेरी पूर्ण केली आहे. बॅट चिन्ह उशिरा मिळूनही विशाल पाटील यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी विकासाचा जाहीरनामा न सांगता संजयकाका यांना टार्गेट करून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. पडळकरांच्या सभेला होणारी धनगर समाजाची होणारी गर्दी लक्षवेधी असली तरी याचा फटका संजयकाका की विशाल पाटील यांना बसणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. काँग्रेस आघाडीचे विशाल पाटील आणिवंचितचे गोपीचंद पडळकर यांनी संजयकाकांच्या विरोधात रान उठवले आहे. या निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवारांनी आश्वासनांची खैरात केली आहे. आता दोन पाटलांच्या स्पर्धेत पडळकर किती मते खाणार, यावर संजयकाकांच्या विजय-पराभवाचे राजकीय गणित अवलंबून आहे. सर्वच उमेदवार ग्रामीण भागात भावकी, जातीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भेटून आपल्यालाच मतदान झाले पाहिजे, असे हट्टाने सांगत आहे. निवडणूक ज्वर सुरू झाला आहे. त्यामुळे शहरात, ग्रामीण भागात कुठेही जा, गप्पांचा फड रंगलेला दिसून येतो आहे. नेते, कार्यकर्ते यांनी, रसद मिळाली तरच प्रचार; अन्यथा तटस्थ, अशी भूमिका घेतल्याने उमेदवार अडचणीत आले आहेत. रसद पुरवली तरी मदत होईल, याची शाश्वती नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.मिरजेत आमदार सुरेश खाडे अंतर्गत संजयकाकांवर नाराज असल्याने ते कितपत मदत करणार? संजयकाकांनी मिरज तालुक्यात प्रत्यक्ष लक्ष घातल्यानेही आमदार खाडे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. याउलट काँग्रेसचे विशाल पाटील यांना मिरज तालुक्याचा अनुभव असल्याने मदनभाऊ गट, वसंतदादा गटाची राजकीय सांगड घालत मताधिक्य मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मिरज तालुक्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसला वंचित आघाडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
 सांगली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आमदार सुधीर गाडगीळ यांनी रस्त्याची केलेल्या कामाबाबत समाधान आहे. अन्य ग्रामीण भागातही आमदार गाडगीळ यांनी रस्त्याची कामे केली आहेत. आतापर्यंत मदनभाऊ पाटील लोकसभा असो की विधानसभा असो; आतापर्यंत सांगली विधानसभा मतदारसंघातून 66 ते 67 हजार मते पडलेली आहेत. ही मते एका अर्थाने काँग्रेसची आहेत. यात भाजपचे संघटन विधानसभा मतदारसंघात वाढवण्याची गरज आहे. यावेळी भाजपची सत्ता महापालिकेत आल्याने हे मताचे गणित बिघडणार का, हा खरा प्रश्न आहे.
 विटा खानापूर मतदारसंघात संजयकाकांना आमदार बाबर मदत करणार का? काँग्रेसचे नेते माजी आमदार सदाशिव पाटील यांची भूमिका काय राहणार? जत तालुक्यात भाजपचे आमदार असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकदही मोठी आहे. दोन्ही पक्षातील नेते,कार्यकर्ते विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागच्या वेळी जत तालुक्यातून संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही. गोपीचंद पडळकर यांच्यासाठीही एक गट कार्यरत झाला आहे. त्यामुळे या खेपेला नेमके काय घडणार,याची उत्सुकता आहे.
तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील या पक्षाचा आदेश पाळत विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरल्या आहेत. मात्र कार्यकर्ते विरोधात आहेत. संजयकाकांची ताकद किती, हेही कळणार आहे. कडेगाव-पलूसमधून भाजपाचे पृथ्वीराज देशमुख हे पक्षाच्या प्रचारासाठी प्रयत्न करीत असले तरी संजयकाकांशी मनापासून सोयरिक नाही. भाजपच्या ताब्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या ताब्यात असल्याने संजय पाटील यांना मताधिक्य मिळवून देताना भाजपची सत्त्वपरीक्षा असेल. शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक यांची परीक्षा आहे. इस्लामपूर-वाळवा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरुध्द सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. यात संजयकाकांना लीड मिळणार की घटणार, हेही दिसून येईल. सर्वच आमदारांची लोकसभा निवडणूक म्हणजे रंगीत तालीम ठरणार आहे. ज्याचे मताधिक्य घटेल तो विधानसभेला मुकेल, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. लोकसभेलाच काँग्रेसचाहातनसल्याने विधानसभेचे राजकीय गणित वेगळेच असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनापासून काम करणार कीकार्यक्रमकरणार, या सर्वांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळणार आहेत.

No comments:

Post a Comment