Tuesday, April 2, 2019

स्थानिक प्रश्‍नांनाच दिले जाणार महत्त्व


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून गेली दोन दिवस जत तालुक्यात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांचेही कार्यकर्ते कामाला लागले आहेत. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचेही आता प्रचार दौरे सुरू होतील. त्यामुळे आता खर्या अर्थाने प्रचाराला रंगत येणार आहे. मात्र जत तालुक्यात स्थानिक प्रश्नांनाच महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे. पाणी, वीज, रस्ते, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती असे किती तरी प्रश्न तालुक्यापुढे आ वासून उभे आहेत. साधारण: नेहमीप्रमाणे याच प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले जाईल.पण यांची पूर्तता कधी होणार हाच प्रश्न आहे.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते सध्या प्रचारात पुढे असल्याचे चित्र आहे. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जत तालुक्यातील मतदान हे महत्त्वाचे आहे. तालुक्यातून आघाडी घेतलेला उमेदवार सहसा पराभूत होत नाही. त्यामुळे सगळ्यांचीच भिस्त जत तालुक्याकडे असणार आहे. यासाठी खासदार पाटील यांनीही पहिल्यांदा जतचा दौरा करण्याचे ठरविले. गेल्या  दोन दिवसांत तालुक्यातील 50 ते 60 गावांत त्यांचा दौरा पूर्ण झाला असून मोठ्या गावात त्यांनी सभा शेतकर्यांची थेट चर्चा भर देऊन प्रचाराचा झंझावात केला. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव ताड, डॉ. रवींद्र आरळी. सभापती तम्मनगौङा रवी-पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, सुनील पवार आदी नेते प्रचारात सक्रिय झाले आहेत.
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेसची मंडळी कामाला लागली आहेत. येत्या काही दिवसांत विशाल पाटील देखील जत दौर्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे अपक्ष लढणार का बहुजन वंचित आघाडीकडून लढणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याने  त्यांना मानणारा गटदेखील सक्रिय झाला आहे. स्थानिक पातळीवरील अनेक युवक कार्यकर्ते यंत्रणा राबवत आहेत एकंदरीत. लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील अनुभवी नेते आहेत. विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर हे युवा नेते आहेत. त्यामुळे बेरोजगारी, युवकांचे प्रश्न शेतीमाल प्रक्रिया उद्योग, तालुक्यासाठी येणारे प्रकल्प, कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर चे पाणी, 42 गावांसाठीचा पाणी प्रश्न या मुद्द्यावर निवडणुकीचा प्रचार एकवटणार आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील प्रचार दौरा संपल्यानंतर दुसर्या टप्प्यात राज्यातील नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. जत तालुक्यातील पुन्हा एकदा गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून गाजत असलेल्याम्हैसाळच्या पाण्यावरती नेत्यांच्या गर्जना ऐकण्यास मिळणार आहे. पुन्हा एकदाम्हैसाळच्या पाण्याची चर्चा, नेत्यांची जोरदार भाषणे, मतदारांच्या टाळ्या.. त्यावरच्या होणार असून निवडणुका लोकसभेच्या असल्या तरी या निवडणुकीत येणार्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादीमधील सर्वच नेते राजकीय मशागत करणार आहेत.

No comments:

Post a Comment