Tuesday, April 9, 2019

खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची बावीस लाखांची फसवणूक

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : लिपीक, अव्वल कारकुनचा गैरव्यवहारात पुढाकार 
जत,(प्रतिनिधी)-
जत तहसीलचा लिपीक लक्ष्मण भवर व प्रांत कार्यालयातील अव्वल कारकुन बिपीन मुगळीकर यांनी अवैध वाहतूक करणार्‍या कडून मोठ्या रकमा घेऊन बोगस चलने केली. प्रत्यक्षात शासकीय खजिन्यात दंडाची रक्कम जमा केलेली नाही. २२ लाख ५० हजारांचा हा अपहार असून बनावट शिक्के, खोटी कागदपत्रे तयार करून आमची व शासनाची फसवणूक केल्याचा दावा ट्रक व डंपर मालकांचा आहे. 

   या सर्व प्रकारची सखोल चौकशी व्हावी व भवर व मुगळीकर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना देण्यात आले आहे. यावेळी किरण ज्योत्याप्पा बेळुंखी, नागेश चंदर पांढरे, संतोष शंकर पाथरूट, दादासाहेब नामदेव हिप्परकर, अरूण शंकर बिराजदार आदी उपस्थित होते. 
   निवेदनात म्हंटले आहे, अवैध वाळू तस्करी प्रकरणी संखचे अप्पर तहसीलदार यांनी गाड्या जप्त करून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर वाळु तस्करीची कबुली देऊन दंडाची रक्कम भरण्यासाठी होकार दर्शविला. चलनासाठी लिपीक बागल, जततहसीलचे लिपीक लक्ष्मण भवर व प्रांत कार्यालयातील अव्वल कारकुन बिपीन मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला.
  वाहने लवकर सुटावी या हेतूने चलन व दंडाची रक्कम भवर यांच्याकडे दिली. यासाठी खर्चाची जादा रक्कम ही त्यांना दिली. मुगळीकर यांनी कवठेमहांकाळ मधून नोटरी यांच्या कडील स्टँपवर बंद पत्र करून आणण्यासाठी सांगितले. ते दिल्यानंतर चलन जमा केल्याचे सांगून चलन जोडून प्रांतांचा आदेश जोडला. मात्र, यापैकी अरूण बिराजदार यांची न सोडता इतर सर्व वाहने सोडण्यात आली. 
   बिराजदार यांनी दि. ३० मार्च रोजी संख अप्पर तहसीलदार यांची भेट घेतली. वाहने सोडण्याची विनंती केली. त्यांच्याकडील आॅनलाईन सिस्टिममध्ये दंडाची रक्कम जमा नसल्याचे निदर्शनास आले. याची चौकशी केली असता लक्ष्मण भवर व बिपीन मुगळीकर यांनी संगनमत करून खोटी चलने, खोटे शिक्के वापरून खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. यामध्ये साडे बावीस लाखांचा गैरव्यवहार करून ही रक्कमेत अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे यात आमची व शासनाची ही मोठ्याप्रमाणात फसवणूक झाली असून या दोन्ही कर्मचाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करण्यात यावा. अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment