चाकरमानी पैसा खर्च करेनात; उत्पन्नघटीमुळे
शेतकऱ्यांकडूनही खर्च बचतीला प्राधान्य
जत,(प्रतिनिधी)-
देशात नोटाबंदीपासून बाजारावर आलेले मंदीचे सावट अजूनही ओसरलेले नाही. शासन मागील दोन अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यालाही फारसे यश आलेले दिसत नाही. सातव्या वेतन आयोगानंतरही चाकरमान्यांच्या हातात पैसा खळखळेल व बाजाराला चैतन्य प्राप्त होईल, अशी व्यापाऱ्यांची आशा होती. परंतु तीसुद्धा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
चाकरमानीही आता जवळचा पैसा अनावश्यक गरजा खर्च करण्यास कचरत आहेत. परिणामी अजूनही बाजार फुललाच नाही. मंदीचा परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सत्तर ते ऐंशी टक्के रोजगार शेती व्यवसायातून प्राप्त होतो. मात्र मागील दोन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचा शेतकयांना सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, खते, कीटकनाशके व मजुरीचे वाढलेले भाव, याच्या प्रमाणात शेतकऱ्याचे उत्पन्न घटत आहे. उत्पादन खर्चानुसार न मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार तुटीचे होत आहेत. शेतकरी
दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.
वर्षभरात कमावलेल्या अल्पशा पुंजीवर शेतकऱ्याला गुजराण करावी लागत आहे. परिणामी अनावश्यक खचाला लगाम घालत आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ ते २० टक्के वाढ झाली. वेतनवाढीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांचे डोळे अधिक उत्पन्न कमविण्याची आशा बाळगून होते. मात्र कर्मचारी वाहने व इतर चैनीच्या वस्तू खर्च करण्यासाठी हात आखडता घेत असल्याने गाड्यांचे शोरुम ओस पडलेले दिसत आहेत. सण-उत्सवाच्या काळात बाजारात
ग्राहकांची थोडी रेलचेल दिसते. पण उत्सव संपताच पुन्हा बाजारात शुकशुकाट दिसतो. गणपती नंतर आता नवरात्र उत्सवावर तशीच परिस्थिती दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांकडून नोकरकपातीचे धोरण...
पाल्याच्या शिक्षणावर होणारा खर्च वाढला आहे. शेतकरी पालक स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो. परिणामी बाजारातील अनेक दुकानांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. ही मंदी सर्वत्र पसरली आहे. मंदीमुळे काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील नोकरांची संख्या कमी
करण्याचे पाऊल उचलले आहे. बेरोजगार तरुण रोजगारासाठी वणवण भटकताना दिसत आहे. व्यापाऱ्यांना माल विक्रीसाठी सेल जाहीर करावेलागत आहेत. सेलच्या पाट्या ठिकठिकाणी दिसत आहेत. शेतीनंतर ग्रामीण भागात दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार देणारा बांधकाम व्यवसाय तर निद्रावस्थेत दिसून येत आहे. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हार्डवेअर, प्लंबिंग, इलेक्ट्रिक, पेंट, विटा आदी व्यवसायांवरही गदा आली आहे.
दोन हजाराच्या नोटा झाल्या गायब
नोटाबंदीनंतर जिकडेतिकडे दोन हजाराच्या नोटांचा बोलबाला होता. नागरिकांना नोटा मोडून घेण्यासाठी व चिल्लरसाठी भटकावे लागत होते. मात्र आता दोन हजाराच्या नोटा बाजारातून गायब झालेल्या दिसत आहेत. आता मोठे व्यवहार नेट बँकिंग किंवा पाचशे रुपयाच्या नोटांनेच होताना दिसत आहे. सरकारनेएवढ्या मोठ्या प्रमाणात छापलेल्या २000 च्या नोटा गेल्या कोठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
No comments:
Post a Comment