जत,(प्रतिनिधी)-
नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून
शहरात आजाराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रचंड वाढलेला कचरा, घाणीचे साम्राज्य, डासांचे वाढलेले प्रमाण आणि शहराला आळ्यामिश्रीत पुरवठा होत असलेले पाणी यामुळे शहराचेच आरोग्य बिघडले आहे.आहे. याबाबत पालिका प्रशासन कसलेही गांभीर्य घेण्यास तयार नसल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.
पन्नास हजारावर लोकसंख्या असणाऱ्या जत शहराला गेल्या काही दिवसांपासून आळ्यामिश्रीत पाणी पुरवठा होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विविध आजाराचे प्रमाण शहरात वाढले आहे. सध्यस्थितीला शहरात ताप, जुलाबाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. शिवाय घाणीचे साम्राज्य पसरल्यानेही रोगराई वाढतानाचे चित्र दिसते आहे. जत पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाचा
फटका शहरातील नागरीकांना सतत बसतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा कधी
चार दिवसातून तर कधी आठ दिवसातून होत आहे. शिवाय ज्या बिरनाळ तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या तलावात गेल्या पाच वर्षांपासूनचा पाणीसाठा आहे.
हा तलाव म्हैसाळ योजनेतून दरवर्षी भरण्यात येतो, परंतु तो कधीच ओव्हर फलो केला जात नाही. शिवाय चार वर्षात मोठा पाऊसच झाला नसल्याने अनेक वर्षांचे साठलेले पाणी या तलावात आहे. शिवाय तलावात वाढलेला गाळ यामुळे मुळ तलावातच आळ्यांचे प्रमाण वाढले आहे. तर इकडे पालिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची अवस्थाही बिकट आहे. गेल्या न अनेक वर्षांपासून या जलशुध्दीकरण केंद्राचे अत्याधुनीकीकरण केलेले नाही. दगड, गोटे, वाळूचे बेड स्वच्छ न केले जात नाहीत. पाण्यात टीसीएल,
तुरटीचे प्रमाण फारसे वापरले जात नाही. शहरातील जवळपास सगळ्याच जलवाहीन्या जीर्ण झाल्याने कुठे ना कुठे गळती सुरू असते. यामुळे जत शहरातल्या नागरिकांना नेहमीच दूषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे जत शहर सतत आजारी अवस्थेत आहे.
वास्तविक पाणी आणि स्वच्छता याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण
प्रशासन कसल्याही प्रकारे हालत नाही. अलिकडच्या पंधरा दिवसापासून तर शहरात आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. डेंग्यू मलेरिया, हिवताप, जुलाब यासारखे आजार वाढत आहेत. तसेच वेळेवर कचरा निर्मुलन होत नाही. परिणामी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात डांस विरोधी औषधे फवारण्याची मागणी नागरीक सतत करत आहेत. परंतु पालिकेकडे औषधेच उपलब्ध नाहीत, अशी अवस्था
जत पालिकेची होवून बसली आहे. तरी जत पालिकेने शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता याकडे गांभीर्याने
लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरल्यास त्याला रोखणे मुश्कील होईल. पाटबंधारे विभागानेही हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment